उत्तम नाटय़गृहांबरोबरच पुरेसे मोठे कलादालन नागपूर शहरात नसल्याने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित राष्ट्रीय समकालीन कला प्रदर्शनाचे आयोजन नागपूरऐवजी भोपाळ येथे केले जाणार आहे. मार्च किंवा एप्रिलमध्ये होणाऱ्या या प्रदर्शनात देशभरातील कलावंतांच्या दोनशेहून अधिक निवडक कलाकृतींचे प्रदर्शन भोपाळ येथे केले जाणार आहे.
दमक्षे सांस्कृतिक केंद्राच्या वतीने गेल्या २७ वर्षांपासून अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन नागपुरात करण्यात येते. मात्र, यंदा २८ व्या वर्षी हे कला प्रदर्शन मोठय़ा पातळीवर करण्याचा निर्णय घेऊन केंद्राने गेल्या सहा महिन्यांपासून या प्रदर्शनाची तयारी सुरू केली. देशभरातील सर्वात मोठे कला प्रदर्शन आयोजित करण्याच्या दृष्टीने अनेक बदल करण्यात आले आहेत. या वर्षीपासून या प्रदर्शनाला राष्ट्रीय रूप देण्यात आले असून राष्ट्रीय पातळीवरील कला स्पध्रेचे रूप याला देण्यात आले आहे.
देशभरातील कला शिक्षण संस्था, कला दालने, अकादमी यांच्याशी संबंधित कलाकारांना केंद्राच्या वतीने आयोजित स्पध्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याकरिता सुमारे दहा हजार ई-मेल व पाच हजार पत्रे पाठविण्यात आले असून तब्बल १६९५ कलाकारांनी या स्पध्रेकरिता प्रवेशिका पाठविल्या होत्या. मान्यवर कलाकारांचा समावेश असलेल्या तज्ज्ञांच्या समितीने त्यातील २२४ कलाकृतींची अंतिम स्पध्रेसाठी निवड केली आहे.
यामधून कनिष्ठ व वरिष्ठ गटात प्रत्येकी चार विजेते निवडले जातील व त्यांना अनुक्रमे एक लाख व दोन लाख रुपयांचे पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देण्यात येईल. याशिवाय, तरुण कलाकारांना त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन करण्यासाठी आर्थिक मदतही केली जाणार आहे, असे केंद्राचे संचालक पीयूषकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्राथमिक निवड समितीचे आयुक्त के.आर. सुबन्ना, निरीक्षक गीतिका कल्हा, समिती सदस्य विलास शिंदे, निर्मलेंदू दास, जयकृष्ण अग्रवाल, जय जरोटिया व राजेंद्र टिक्कू यावेळी उपस्थित होते. अंतिम फेरीसाठी वेगळी परीक्षण समिती नेमली जाणार आहे. प्राथमिक फेरीसाठी कलाकृती छायाचित्र किंवा डिजिटल स्वरूपात मागविण्यात आल्या होत्या.
अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या २२४ कलाकृती या मूळ स्वरूपात पाठवाव्या लागणार आहेत. या कलाकृतींचे प्रदर्शन भोपाळ येथील भारत भवन येथे मार्च किंवा एप्रिलमध्ये आयोजित केले जाणार आहे. दमक्षे सांस्कृतिक केंद्राचे मुख्यालय नागपुरात असताना एवढय़ा मोठय़ा पातळीवर होत असलेल्या प्रदर्शनाचा लाभ नागपूर व परिसरातील रसिकांना मिळणे अभिप्रेत होते.
मात्र, नागपुरात २०० हून अधिक कलाकृतींचे प्रदर्शन सामावून घेईल असे एकही कलादालन नसल्याने नागपूरऐवजी भोपाळ येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राकडे किंवा नागपुरातील सध्याच्या कलादालनांमध्ये दोनशेच काय शंभर कलाकृतींचे प्रदर्शन करणेही कठीण असल्याचे केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, असे प्रदर्शन नागपुरात करावयाचे असेल तर दमक्षे केंद्राला शासनाने अधिक जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी माध्यमांनी ही मागणी रेटावी, असे मत प्रदर्शन परीक्षण समितीच्या सदस्य गीतिका कल्हा यांनी मांडले.
नागपुरात चांगल्या सभागृहांची वानवा असताना मोठय़ा कलादालनाअभावी नागपूरकर रसिकांना या राष्ट्रीय समकालीन कलाप्रदर्शनाला मुकावे लागणार आहे.