कोल्हापूर जिल्ह्य़ामध्ये अन्य जिल्ह्य़ांच्या तुलनेने पाण्याची स्थिती चांगली आहे. तरीसुध्दा राष्ट्रीय पेयजल योजना प्राधान्याने पूर्ण कराव्यात. टंचाईग्रस्त व पन्नास पैसे पेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावातील पिण्याच्या पाण्याची योजना त्वरित पूर्ण करून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून द्यावे, असा आदेश पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी रविवारी येथे शासकीय अधिकाऱ्यांना दिला.
    कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आलेले मंत्री प्रा. ढोबळे यांनी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्य़ातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यालयात योजनांची कामे करण्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रांची माहिती डिजिटल पध्दतीने जाहिरात फलकावर दर्शनी भागात लावावी. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील राष्ट्रीय पेयजल योजना, तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना, कुपनलिका आदी योजनांच्या कामांचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत  दिल्या. लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सरपंच यांच्या संपर्कात राहून योजनांची माहिती द्यावी व कामाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांची मदत घ्यावी, असेही ते म्हणाले.
    कोल्हापूर जिल्ह्य़ात एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याचे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी जिल्ह्य़ात ४७ गावे टंचाईग्रस्त असून पावणे दोन कोटी रुपयांचा टंचाईचा आराखडा तयार करून कामे सुरू केली असल्याचे सांगितले. कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे यांनी जिल्ह्य़ात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांची माहिती दिली. बैठकीस जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी, तालुक्यातील पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता, शाखा अभियंता उपस्थित होते.