विनय आपटे हे पक्के प्रायोगिकवाले होते. म्हणूनच त्यांनी नाटय़ परिषदेत प्रायोगिक नाटय़प्रवाहाला आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. याच हेतूने दोन वर्षांपूर्वी अमोल पालेकर यांना नाटय़संमेलनाचे उद्घाटक बनवून त्यांनी नाटय़व्यावसायिकांचे त्यांच्याकरवी कान टोचले. नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत बोगस मतदानाचा घोटाळा झाला नसता तर विनय आपटे यांचे पॅनल निवडून आले असते आणि त्यांनी यशवंत नाटय़संकुलात प्रायोगिक रंगमंच नक्कीच निर्माण केला असता. म्हणूनच गेले वर्षभर भिजत घोंगडे पडलेल्या नाटय़ परिषद निवडणुकीतील घोटाळय़ाचा तातडीने छडा लावणे हीच विनय आपटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे परखड मत ज्येष्ठ नाटय़समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी व्यक्त केले. व्यावसायिक नाटय़निर्माता संघ, नाटय़व्यवस्थापक संघ आणि श्री शिवाजी मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित विनय आपटे यांच्या शोकसभेत ते बोलत होते. विनय आपटे यांनी आपल्या प्रारंभीच्या एकांकिका व नाटकांतून प्रायोगिकतेच्या वेगवेगळय़ा शक्यता आजमावून पाहिल्या, असे नाडकर्णी म्हणाले.
‘विनय आपटे हा अपयशी नट आहे असे काहींनी मला सांगितले होते. परंतु ‘रानभूल’मधील त्याच्या अभिनयावर मी बेहद्द फिदा होते. मला त्यालाच घेऊन नाटक करायचे होते. आणि गंमत म्हणजे हा समज खोटा ठरवत त्याला घेऊन केलेल्या ‘पाऊल न वाजवता’ या माझ्या नाटकाचे पावणेदोनशेच्या वर प्रयोग झाले,’ असे निर्मात्या लता नार्वेकर यांनी सांगितले. ‘नाटक, चित्रपट व दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत लीलया वावरणारा विनय हा अष्टपैलू कलावंत होता,’ अशा शब्दांत दिग्दर्शक विजय केंकरे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ‘विनयच्या नाटकांमध्ये आणि दूरदर्शनवरील त्यांच्या लघुनाटिकांमध्ये पात्रांचे सौंदर्यपूर्ण आकृतिबंध असत,’ असे सांगून नाटककार सुरेश खरे म्हणाले की, ‘अण्णा हजारे कुणालाही माहीत नव्हते तेव्हा विनयच्या दिग्दर्शनाखाली आम्ही त्यांच्यावर पहिला लघुपट तयार केला होता.’ नियोजित नाटय़संमेलनाध्यक्ष अरुण काकडे, श्रीशिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत भालेकर, अ‍ॅड. कमलाकर बेलोसे, अभिनेते सुरेश भागवत यांनीही विनय आपटे यांच्या आठवणी जागविल्या.  

D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार