जायकवाडीत वरील धरणांमधून पाणी सोडावे. जायकवाडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना किमान दोन आवर्तने मिळेल एवढे पाणी द्यावे, आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडावे अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा पैठण तालुक्यातील नवगाव येथील ग्रामस्थांनी दिला.
जायकवाडी संघर्ष कृती समितीचे निमंत्रक जयाजीराव सूर्यवंशी, ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप देशमुख, शेतकरी संघटनेचे कैलास तंवार यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांची या बाबत बैठक झाली. त्यावेळी बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला. हक्काचे पाणी मिळू नये, म्हणून मराठवाडय़ास न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून ठेवण्याचे काम सरकार करीत आहे. पाणी मिळू नये, म्हणून कायद्यालाच आव्हान देण्याचे धोरण नगर जिल्ह्य़ातील नेते मंत्री मधुकरराव पिचड व बाळासाहेब थोरात, तसेच माजी मंत्री शंकरराव कोल्हे घेत आहेत. मात्र, त्यांचा हा डाव न्यायालयीन लढाईत हाणून पाडू, असे अॅड. देशमुख यांनी सांगितले.
समन्यायी पाणीवाटप झाले असते तर धरणात ८४ टक्के पाणीसाठा झाला असता. ४५ टीएमसी पाणी वरच्या नेत्यांनी अतिरिक्त राखून ठेवले आहे. श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, राहाता, राहुरी, संगमनेर परिसरातील लोकांनी जेल भरो आंदोलन करण्याचा दिलेला इशारा लक्षात घेऊन त्याला विरोध करण्यासाठी उद्या (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता क्रांती चौकात निदर्शने केली जाणार असल्याचे जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले. सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आता वारकऱ्याची भूमिका सोडून सरकारला जाब विचारायला हवे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे कैलास तंवर यांनी केले.