दोन आठवडय़ांवर येऊन ठेपलेली नवी मुंबई पालिकेची निवडणूक, वीस वर्षे सत्ता हातात ठेवलेले राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री गणेश नाईक यांच्या विरोधात शिवसेना, भाजप, काँग्रेस, शेकाप या गेली अनेक वर्षे सत्तेपासून दूर राहिलेल्या विरोधकांमध्ये आहे. त्यामुळे नाईक यांचे संस्थान खालसा होणार की आणखी टिकणार हा चर्चेचा विषय असून शिवसेना भाजप युतीचा भगवा फडकणार की भडकलेल्या सैनिकांच्या संतापात आणखी पाच वर्षे संघर्ष करावा लागणार हे पंधरा दिवसांत कळणार आहे. त्यामुळे बुधवारपासून सुरू झालेल्या आयपीएल क्रिकेट सामन्याबरोबर नवी मुंबई पॉलिटिकल लीग (एनपीएल) सामने रंगणार आहेत.
नवी मुंबईतील ही पालिका निवडणूक मागील वीस वर्षांपेक्षा अधिक लक्षवेधी आणि चर्चेचा बिंदू असणारी आहे. गेल्या दहा महिन्यांत देश आणि राज्य पातळीवरील राजकारण ढवळून निघाले असून प्रस्थापितांचा पालापाचोळा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या या स्थानिक निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. केंद्र आणि राज्यात भाजपमध्ये मिळालेल्या यशाचा झंझावत दिल्लीत रोखला गेल्याने त्याचे पडसाद या वांद्रे आणि या सायबर सिटीत कसे उमटतात याकडे राजकीय निरीक्षक बारकाईने पाहत आहेत. नवी मुंबईतील ही राजकीय लढाई प्रस्थापितांच्या विरोधातील राहणार असून नाईक यांनी ९७, ९८ ही दोन वर्षे वगळता गेली १८ वर्षे पालिकेवर एकहाती सत्ता ठेवली आहे. त्यामुळे गेल्या १८ वर्षांत जलसंपदा विभागाकडून विकत घेतलेले मोरबे धरण, अद्ययावत असे पालिका मुख्यालय, नेरुळ येथील वंडर व रॉक उद्यान, शहरातील सिमेंट क्राँक्रीटीकरण, शाळांचा विकास, सांडपाण्यावरील प्रक्रिया केंद्र, मलनि:सारण वाहिन्या, २४ तास पाणीपुरवठा, तीस रुपयांत पन्नास लिटर पाणी, डम्पिंग ग्राऊण्ड, ठाणे-बेलापूर रस्ता यांसारख्या मोठय़ा प्रकल्पांच्या बळावर नाईक या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. थोडक्यात विकासाची जपमाळ त्यांच्या हातात राहणार असून त्याविरोधात पालिकेतील घराणेशाही, पाच टक्के भ्रष्टाचाराचे आरोप, आजूबाजूच्या कोंडाळ्याची एकधिकारशाही यासारख्या विषयांना घेऊन विरोधक तोफा डागणार आहेत. हाच प्रयोग विरोधकांनी यापूर्वी लोकसभा विधानसभा निवडणुकीत केला असून त्याला यश आल्याने तोच प्रचाराचा फॉम्र्युला वापरला जाणार आहे मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून नाईक यांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना बदनामीची न्यायालयीन नोटीस दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक विकास विरुद्ध घराणेशाहीच्या भोवती फिरणार आहे. वीस वर्षांत नाईक कुंटुबातील दोन जणांनी १५ वर्षे पालिकेत महापौरपद भूषविले आहे तर खासदारकी, आमदारकी त्यांच्या घरात राहिली आहे. घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या शिवसेनेने संपूर्ण शहरात घराणेशाहीलाच प्रोत्साहन दिले आहे. याशिवाय डागाळलेले नगरसेवक इतकी वर्षे नाईक यांच्या तंबूत मिरवत होते ते या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आसऱ्याला गेले आहेत. त्यामुळे कोणी तरी ‘पालक’ लागणाऱ्या या नगरसेवकांवर तिकिटांची खैरात करण्यात आली असून ऐरोलीतील नगरसेवक एम. के. मढवी यांना तीन उमेदवारी दिल्याने मोठे आश्र्यय व्यक्त केले जात आहे. याशिवाय मुक्तार अन्सारी या भंगार माफियाच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार उभा न करून त्याला मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. नाईक यांनी इतकी वर्षे खेळलेली खेळी या वेळी शिंदे खेळत आहेत. नाईक यांच्या प्रस्थापितांबरोबरच शहरात काही नगरसेवकांचीदेखील मक्तेदारी आहे. दिघा येथील नगरसेवक अनिल गवते व त्यांची पत्नी अपर्णा गवते यांच्या विरोधात शिवसेनेचे अमित वैती व मुक्तार अन्सारी उभे ठाकले आहेत. सभागृह नेते अनंत सुतार यांनी ऐरोली सेक्टर वीसमधील प्रभाग क्र. १४ मध्ये घुसखोरी केली आहे. त्याच्या विरोधात भाजपचे सुभाष अंभोरे लढणार असून त्यांचा पुतण्या अंकुश सुतार अपक्ष उभा राहिल्याने आव्हान निर्माण करणार आहे. सुतार यांनी आपली पत्नी शशिकला सुतार यांना मैदानात उतरविले आहे.  ऐरोलीतील नगरसेवक एम. के. मढवी यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने नगरसेवक पती व त्याच्या पत्नीला उतरविले आहे. त्यामुळे दोघेही प्रस्थापित असल्याने इथे विस्थापितांची डाळ शिजणार नाही. घणसोली येथे काका-पुतण्याची भांडणे या निवडणुकीमुळे लागली असून प्रभाग ३२ मध्ये संजय पाटील विरुद्ध प्रशांत पाटील यांचा सामना होणार आहे. प्रशांत काही दिवसांपूर्वी सेनेत गेलेले आहेत. कोपरखैरणे येथील एक लक्षवेधी निवडणूक प्रभाग क्रमांक ४० मध्ये होणार असून विजयाची हॅट्ट्रिक साधणारे नगरसेवक शिवराम पाटील यांच्या विरोधात केशव म्हात्रे आहेत. हे दोघेही मावळत्या सभागृहातील नगसेवक असून प्रस्थापित आहेत. वाशीत विठ्ठल मोरे, किशोर पाटकर, संपत शेवाळे या प्रस्थापित नगरसेवकांची अविनाश लाड, प्रकाश माटे, अनिल कौशिक यांची पत्नी अशी लढत होणार आहे. नेरुळमध्ये सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत या प्रस्थापिताच्या विरोधात राष्ट्रवादीचे धनाजी ठाकूर आघाडी उघडणार आहेत.
विकास महाडिक, नवी मुंबई