नवी मुंबईची निर्मिती ही येथील ग्रामस्थांनी दिलेल्या जमिनींमुळे झाली आहे. शहरीकरणामुळे गाव आणि शहराचे जरी एकत्रीकरण झाले असले तरी गावाचे गावपण आजही जपले जात आहे. चैत्र महिन्यापासून नवी मुंबईतील २९ गावांत जत्रांचा मोसम सुरू झाला आहे. यापूर्वी बोनकोडेच्या पल्याड जत्रा नव्हत्या. त्या ठिकाणी यात्रा होत असत मात्र अलीकडे या २९ गावांपैकी बहुतांशी गावांत जत्रा साजऱ्या केल्या जातात. जत्रा म्हणजे कुलदेवतेचा जागर, गुढीपाडव्यानंतर सुरू होणाऱ्या या जत्रा हनुमान जयंतीपर्यंत असतात. परवाच हनुमान जयंतीनंतर आलेल्या रविवारी तळवली आणि नेरुळमध्ये जत्रा पार पडल्या पण या वेळच्या जत्रांवर निवडणुकीचे सावट दिसून आले. जत्रा म्हणजे पाहुणे, मित्रमंडळी, आप्तेष्ट यांना बोलवून त्यांचे मानपान, स्नेहभोजन, विशेषत: मांसाहर करण्याची पूर्वी प्रथा होती. त्यामुळे जत्रेची वाट बच्चेकंपनीसह वडीलधारी माणसेदेखील मोठय़ा आपुलकीने पाहत होती मात्र आता काळ बदलला, नवी मुंबईतील गावांनाही शहरीकरणाचे वेध लागले आहे. साडेबारा टक्क्यांच्या फेऱ्यामुळे भाऊ भावाचे वैरी झाले तर बहिणींनी रक्षाबंधनला जाणे बंद केले, यात आता निवडणूक नावाचा प्रकार आल्याने होती नव्हती आपुलीकदेखील रसातळाला गेली. पैशामुळे दूर झालेली नाती निवडणुकीमुळे अधिक लांब गेली असल्याचे या जत्रांवरून दिसून आले. जत्रेत पक्षाच्या प्रचारावरच जास्त भर देण्यात आला होता. उमेदवार या जत्रेचा पुरेपूर लाभ उठवत या जत्रेत मिसळताना पाहायला मिळाले. पालिका निवडणुकीत २९ गावांसाठी २९ प्रभाग तर झाले आहेतच पण काही प्रभाग शहरांना जोडले गेले आहेत. त्यामुळे एका गावात निवडणुकीच्या बोहल्यावर चढणारे पाच ते सहा जण आहेत. त्यामुळे गाव विविध पक्षांत विभागले गेले असून जत्रेतही अशा प्रकारे राजकारण घुसले आहे. निमंत्रणाच्या संदेशाऐवजी अमक्या तमक्याकडे जत्रेला जाऊ नका, असे संदेश या जत्रेनिमित्त फिरत होते. गावकीच्या एकोप्यासाठी होणाऱ्या जत्रा एकमेकात दुही निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत, अशीच नाराजीची चर्चा भाविकांमध्ये होत असल्याचे आढळून आले.