नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानानंतर वीस वर्षे पालिकेत एकहाती सत्ता ठेवलेल्या नाईक यांची सत्ता जाणार की राहणार ही एकच चर्चा उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. काही जनमत चाचणीत नवी मुंबईकरांनी पुन्हा सत्तेचा सोपान नाईक यांच्या हाती सोपविल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र महापालिकेत यावेळी त्रिशंकू स्थिती असेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
देशातील अनेक प्रांतांतील नागरिक नवी मुंबईत राहात आहेत. शिवसेना मराठीचा अभिमान बाळगत असल्यामुळे अमराठी मतदार शिवसेनेकडे जास्त प्रमाणात झुकत नसल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीत मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांना मताधिक्य देण्यात आले, पण विधानसभा निवडणुकीत शहराने शिवसेनेच्या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांना नाकारले आहे. मे १९९५ मध्ये शिवसेनेची पालिकेवर आलेली सत्ता ही गणेश नाईक यांचे वैयक्तिक परिश्रम असल्याचे मानले जाते. त्या वेळी साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या शहराची लोकसंख्या आता चारपट वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या जोरावर ही सत्ता आल्याचे दिसून येते. मात्र, आता काळ बदलला असून शहरी नागरिक प्रादेशिक पक्षांपेक्षा राष्ट्रीय पक्षांना जवळ करीत असल्याचा अनुभव आहे, पण नवी मुंबईत काँग्रेस व भाजप रुजले नसल्याने मतदारांनी तिसरा पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती दिल्याचे दिसून येत होते. या मतदाराबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसची मदार झोपडपट्टी व ग्रामीण आणि माथाडी भागांवर आहे. कोणावरही आरोप न करता मात्र केलेल्या आरोपांना पहिल्यांदाच सडतोड उत्तर देऊन विकासाचा मुद्दा पुढे केलेल्या नाईक यांना मतदानोत्तर जनमत चाचणीत स्पष्ट बहुमत देण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पिछाडीवर पडलेल्या नाईक यांनी आपला मतांचा बॅकलॉग भरून काढल्याची चर्चा आहे. नाईक यांनी मतदानाच्या दिवशी सर्व प्रसारमाध्यमांद्वारे केलेल्या कामांची जंत्री ठेवून प्रचाराचा शेवट केला.
भाजपला बेलापूर मतदारसंघातच आशा असून २३ उमेदवारांपैकी भाजपचे सात-आठ नगरसेवक निवडून येणार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. केंद्र सरकारवरील नाराजीमुळे पक्षाचा धुव्वादेखील उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वच पक्षांनी शहरी भागात, जास्त ग्रामीण भागातील उमेदवार दिले आहेत. त्याचाही फायदा-तोटा काही उमेदवारांना होणार आहे. शिवसेनेला या वेळी चांगले वातावरण होते, पण सेनेतील बंडखोरी या पक्षाला भोवणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे या पक्षाची विद्यमान नगरसेवकापेक्षा केवळ (१७) दुप्पट संख्या होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वीच्या पालिका निवडणुकीत काही उमेदवार हे केवळ बोगस मतदानामुळे निवडून आले होते. मतदार याद्यांची वेळोवेळी झालेल्या छाननीमुळे बोगस मतदारांची संख्या कमी झाली आहे. प्रत्येक उमेदवाराच्या अस्तित्वाची लढाई असल्याने बोगस मतदार पकडून देण्याची जणू काही स्पर्धा सुरू असल्याचे चित्र होते. सर्व प्रकारच्या वर्तमानपत्रांत राज्यातील चार पालिकांची तुलना करणारी पत्रके वाटली गेली आहेत. सर्व भाषेतील वर्तमानपत्रातून सकाळी हाती पडलेल्या या विकासकामांच्या तुलनात्मक आलेख नजरेसमोर ठेवूनच काही जणांनी मतदान केले आहे.
नाईक यांना ५६ हा जादूई आकडा गाठता येणार नाही अशी चर्चा असून शिवसेना-भाजप युतीचे एकत्र नगरसेवकही ५०पेक्षा जास्त आकडा पार करू शकणार नाहीत. त्यामुळे पालिकेत ९५ ते २००५ सारखी त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विकास महाडिक, नवी मुंबई