नवी मुंबई पालिका निवडणुकीत विविध राजकीय पक्षांची क्षमता निश्चित

नवी मुंबई पालिका निवडणुकीत प्रत्येक प्रमुख पक्षाची जागा दिसून आली असून शेकाप, आरपीआय, बसपा, राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांच्या तर अनामत रकमा जप्त झाल्या असल्याचे स्पष्ट झाले.

नवी मुंबई पालिका निवडणुकीत प्रत्येक प्रमुख पक्षाची जागा दिसून आली असून शेकाप, आरपीआय, बसपा, राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांच्या तर अनामत रकमा जप्त झाल्या असल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करण्याचा शहाणपणा महाराष्ट्र  नवनिर्माण पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी दाखविल्याने पक्षाची झाकली मूठ सव्वा लाखाची ठरली आहे. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन अपक्ष निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला, पण तोही असफल ठरल्याने निवडणुकीपूर्वी हात दाखवून अवलक्षण नको हा ठाकरे यांचा अंदाज खरा ठरला आहे.
नवी मुंबई पालिका निवडणूक अनेक बाजूने वैविध्यपूर्ण ठरली. प्रत्येक प्रमुख पक्षांना आपली ताकद आणि मतदारांमधील स्थान निश्चित झाले आहे. नवी मुंबईत अठरापगड जातीचे विविध धर्म, प्रांतातील नागरिक राहात आहेत. त्यामुळे येथील आठ लाख मतदारांपैकी चार लाख मतदारांनी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना ‘जागा’ दाखविली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत न देऊन मतदार नाराज असल्याचे दाखवून देण्यात आले आहे. पक्षापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्यावर विश्वास दाखवताना केवळ चार नगरसेवकांची कमतरता मतदारांनी ठेवली आणि वीस वर्षे सत्ता भोगणाऱ्या नाईक कुटुंबाला स्पष्ट बहुमत न देता झालेल्या चुका सुधारण्याची एक संधी मतदारांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या अगोदरपेक्षा जास्त देण्याची किमया मतदारांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेसला दोन अंकी आकडा गाठता आला असून भाजपपेक्षा आम्ही सरस असल्याची पाठ नगरसेवक थोपटून घेत आहेत. भाजपवर मतदार हळूहळू नाराज होत असल्याचे हे द्योतक असून या पक्षाला केवळ सहा जागा मिळविता आलेल्या आहेत. या पक्षाचे अध्यक्ष सी. व्ही. रेड्डी आणि युवा नेते म्हणवणारे वैभव नाईक यांना आपली पत्नी वैष्णवी यांना निवडून आणता आलेले नाही. त्यामुळे या पक्षाचे हवेत घिरटय़ा घालणारे विमान जमिनीवर उतरले आहे. त्यामुळे आमदार मंदा म्हात्रे यांची राजकीय कुवतही स्पष्ट झाली आहे.
पक्षाच्या पाणिपताला शिवसेना जबाबदार असल्याचे मंदा म्हात्रे यांनी जाहीर केले आहे. मोदी लाट ओसरल्यानंतर झालेल्या या निवडणुकीत स्थानिक नेत्यांना ताकद दाखविण्याची संधी होती. शिवसेनेला तर विनाश काळी विपरीत बुद्धी सुचल्याने या पक्षाची पुन्हा सत्ता येण्यास आणखी बराच काळ जाणार आहे. अभी नही तो कभी नही अशी स्थिती पक्षाची होती, मात्र पक्षांच्या आयाराम नेत्यांमुळे सत्ता हातातून निसटली आहे. त्यामुळे दैव देते आणि नेते नेतात अशी त्यांची स्थिती झाली आहे. या चार प्रमुख पक्षांबरोबर आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, बसपा, समाजवादी, धर्मराज्य, शेकाप, हिंदुस्थान मानव पक्ष यांसारख्या फुटकळ पक्षाची जागा मतदारांनी केविलवाणी करून टाकली आहे.
या सर्व छोटय़ा पक्षांत एक पक्ष समजदार आणि मतदारांची पावले ओळखणारा ठरला आहे. मनसेने ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरावरून टीका झाली, मात्र पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा तो निर्णय योग्य असल्याचे आता स्पष्ट दिसून आले आहे. मनसेने येथील निवडणूक लढवावी यासाठी काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या वेळी किती जण निवडून येणार ते लिहून द्या, असा प्रतिसवाल ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांची बोलती बंद झाली होती. त्यामुळे हात दाखवून अवलक्षण करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती. निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. त्यामुळे पक्षाने अधिकृत एकही जागा न लढविल्याने पक्षाची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली आहे.
विधानसभा निवडणुकीत या पक्षाच्या दोन उमेदवारांनी दहा हजारांच्या वर मते घेता आली नव्हती. पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे यांनी केलेल्या सर्वेक्षणात पक्षाचा एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता निवडून येण्याच्या क्षमतेचा नाही हे त्यांच्या ध्यानात आले होते. त्यामुळे निवडणूक लढवाचा नारा घेऊन गेलेल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या, पण त्यांचा तो निर्णय योग्य असल्याचे आता दिसून येत आहे. पक्षाचे राजीनामे देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या पाच जणांना पाच हजार मतांचाही पल्ला गाठता आलेला नाही. त्यामुळे त्यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे.
विकास महाडिक, नवी मुंबई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Navi mumbai municipal elections determine the ability of various political parties

Next Story
ऐरोलीतील नाटय़गृहाचे यंदा कर्तव्य!
ताज्या बातम्या