नवी मुंबईत जप्त करण्यात बेकायदा वाहनांची नोंद वाहतूक विभागाकडून होत नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. आतापर्यंत विनाकागदपत्र जप्त करण्यात आलेल्या वाहनांची आकडेवारी मागितली असता हा प्रकार आढळून आला आहे.
रस्त्यावर चालणाऱ्या संशयित वाहनांना थांबवून पोलिसांकडून संबंधित वाहनाची कागदपत्रे तपासली जातात. मात्र जे वाहन विना कागदपत्रांचे चालते, अशा वाहनाला संबंधित पोलीस वाहतूक पोलीस ठाण्याभोवतीच्या मोकळ्या जागेत उभी करून कागदपत्रे दाखवा आणि वाहन घेऊन जा असे सांगतात. काही वाहनांची कागदपत्रे उपलब्ध नसल्याने वाहन पुन्हा ताब्यात घेण्यासाठी हा मालकवर्ग पोलिसांसमोर जात नाहीत व त्यामुळे ही वाहने वर्षांनुवर्षे वाहतूक पोलीस ठाण्याभोवती गंजून बेवारस पडून असतात. मात्र या वाहनांची कोणतीही नोंद वाहतूक विभागाकडे केली जात नाही.वाहनांची नोंदच वाहतूक विभागाकडे नसल्याने अनेक वर्षांपासून वाहतूक पोलिसांजवळील बेवारस वाहने गेली कोठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नवी मुंबई वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाकडून तीन आसनी रिक्षा स्क्रॅप करून त्याची लिलाव पद्धतीची खुली बोली लावली जाते. मात्र वाहतूक विभागाकडील बेवारस वाहनांबाबत अजून कोणतेही धोरण आखले गेले नाही. याच परिस्थितीमुळे मागील वर्षी खोपोली येथील वाहनचालकाचे वाहन पनवेल येथील रस्त्यावरून विनाकागदपत्राचे जात असताना वाहतूक पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर हे वाहन पनवेलच्या वाहतूक विभागाच्या ठाण्यात जमा करण्यात आले. ज्या पोलिसाने हे वाहन जमा केले ते वाहतूक नियमनासाठी गेल्यावर संबंधित वाहनचालकाने पोलिसांच्या ताब्यातील आपले वाहन पळवले होते. काही दिवसांनी वाहन नसल्याचे कळल्यावर संबंधित पोलिसाने कामोठे पोलीस ठाण्यात हे वाहन चोरी झाल्याची तक्रार नोंदविली.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कामोठे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी या चोरी प्रकरणात या वाहनचालकाला वाहनासह त्याच्याच घरातून खोपोली येथून अटक केली. परंतु ही घटना घडल्यापासूनही नवी मुंबईच्या वाहतूक विभागाने कोणताही बोध घेतला नाही, याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आजही नवी मुंबईच्या वाहतूक विभागात स्वतंत्र मुद्देमाल कक्ष आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस तैनात नाहीत, अशी विदारक परिस्थिती आहे.

नवी मुंबई वाहतूक विभागात पोलिसांनी वाहने जप्त केल्यावर संबंधित वाहनांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्याची तरतूद आहे. मात्र वाहतूक पोलीस ठाण्यात मुद्देमाल ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग नाही. हा विभाग असावा, याबाबत कायदेशीर बाबी पडताळून पाहू त्यानंतरच पुढील निर्णय घेता येईल.
अरविंद साळवी, पोलीस उपायुक्त, नवी मुंबई, वाहतूक विभाग