सोनहिरा साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला असे आपल्याला वाटत नाही. दोन्ही काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नसून एकत्र आम्ही सुखेनव नांदत असल्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सोनहिरा साखर कारखान्याच्या कार्यक्रम आणि टेंभू योजनेच्या तिस-या टप्प्यातील पाणी योजनेच्या उद्घाटनासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्यासाठी वेळेत बदल करून कार्यक्रम एक दिवस अगोदर घेण्यात आला. मात्र पवार यांच्यासह गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. टेंभू योजनेचा कार्यक्रम शासकीय असल्याने शिष्टाचार म्हणून जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे हे उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीच्या अन्य कार्यकर्त्यांसह नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली.
याबाबत विचारले असता डॉ. कदम म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय बठका सुरू असल्याने कृषिमंत्री शरद पवार उपस्थित नव्हते. जयंत पाटील यांचा वाढदिवस असल्याने तेही कार्यक्रमात व्यग्र होते. गृहमंत्री आर. आर. पाटील मात्र का उपस्थित राहिले नाहीत हे विचारले जाईल. राजकीय पातळीवर दोन्ही पक्ष एकत्र काम करीत असून कोणतेही मतभेद आमच्यामध्ये नाहीत.
दरम्यान, टेंभूच्या पाणीपूजनाचा कार्यक्रम रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते डॉ. पतंगराव कदम, शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. निमंत्रणपत्रिकेत विद्यमान आमदारांची नावे होती. मात्र या योजनेसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणा-या माजी लोकप्रतिनिधींची नावे नसल्याच्या कारणांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी अघोषित बहिष्कार टाकला होता.