दोन मंत्री व स्थानिक आमदाराने प्रचारात सक्रिय सहभाग नोंदविल्यानंतरही गडचांदूर नगर पालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला असून येथे राष्ट्रवादी काँग्रेस हा ७ जागांवर विजय संपादन करीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्या पाठोपाठ काँग्रेस ५, भाजप ३ व शिवसेनेने २ जागांवर विजयी मिळवला आहे. राज्यात सत्ता स्थापनेनंतर भाजपचा जिल्ह्यातील हा सर्वात मोठा पराभव आहे.
कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर असलेल्या गडचांदूर नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. त्यानंतर आज मतमोजणीनंतर धक्कादायक निकाल लागले असून राज्यातील सत्ताधारी भाजप व शिवसेनेचा येथे दारुण पराभव झाला आहे. या पालिकेत भाजपचा झेंडा फडकावा म्हणून केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थ, नियोजन व वनमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, स्थानिक आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी विशेष लक्ष घातले होते. अहीर व मुनगंटीवार यांनी तर येथे प्रचारसभांचा धडाकाच लावला होता. मात्र, तरीही येथे भाजपचा धुव्वा उडाला. येथे भाजपला केवळ तीन जागा जिंकता आल्या. त्या तुलनेत किमान शक्ती व जिल्ह्यात आमदार नसतांनाही राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, माजी आमदार सुदर्शन निमकर व माजी सभापती अरुण निमजे यांच्या अथक परिश्रमाने ७ जागा जिंकता आल्या. काँग्रेसला माजी आमदार सुभाष धोटे, प्रभाकर मामुलकर, अरुण धोटे व अन्य नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांची सभा घेतल्यानंतरही केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेला जेमतेम २  जागांवर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये हरीभाऊ माणिक मोरे (भाजप), मधुकर नारायण कोवळे (भाजप), विजयालक्ष्मी अरविंद डोहे (राष्ट्रवादी), आनंदी रामसेवक मोरे (भाजप), प्रभाग क्रमांक २ शांताबाई निवृत्ती मोतेवाड (राष्ट्रवादी), कल्पना अरुण निमजे (राष्ट्रवादी), निलेश शंकरराव ताजने (राष्ट्रवादी), अब्दुल हफीज अब्दुल गणी (राष्ट्रवादी), प्रभाग क्रमांक ३ चंद्रभागा विठ्ठल कोरवते (शिवसेना), शरद सुरेश जोगी (राष्ट्रवादी), सुरेखा विठ्ठल गोरे (राष्ट्रवादी), सचिन पांडूरंग भोयर (शिवसेना), तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये विद्या दुर्योधन कांबळे (काँग्रेस), रेखा बंडे धोटे (काँग्रेस), सागर सुरेश ठाकूरवार (काँग्रेस), अरुणा सतीश बेत्तावार (काँग्रेस) यांचा समावेश आहे.
या १७ उमेदवारांमध्ये १ महिला आणि ७ पुरुष निवडून द्यावयाचे होते. यात अनुसूचित जातीकरिता ३ जागा व जमातीकरिता २ जागा आणि नामाप्रकरिता ५ जागा राखीव होत्या. या निवडणुकीत स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. वामनराव चटप यांच्यासह बसपा, भारिप यांचा एकही नगरसेवक विजयी झाला नाही, तर अनेक दिग्गज उमेदवारांना या निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागली. निवडणूक अधिकारी शंतनू गोयल यांनी निकाल जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला.
बल्लारपुरात
गणेश कोकाटे विजयी
बल्लारपूर नगर पालिकेच्या प्रभाग दोनमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत बसपाचे गणेश कोकाटे विजयी झाले. कोकाटे यांना १ हजार ६६७ मते मिळाली. त्यांनी भारिप-बहुजन महासंघाचे प्रशांत झामरे यांचा पराभव केला. येथे भाजप व काँग्रेस तिसऱ्या व चौथ्या स्थानी राहिली.