तब्बल ४२ वर्षे मरण जगत निवर्तलेल्या अरुणा शानबाग यांच्या मृत्यूनंतर अत्याचाराचा एक क्रूर काळ संपुष्टात आला. अरुणा शानबाग यांना न्यायव्यवस्थाही न्याय देऊ शकली नाही, अशी खंत व्यक्त करीत असतानाच समाजातील हिंस्त्र, विकृत वृत्तीविरोधात प्रबोधन करण्याची गरज असल्याच्या प्रक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केल्या.
स्त्री अत्याचार विरोधी परिषदेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. सीमा साखरे म्हणाल्या, अरुणाचा मृत्यू मनाला हळहळ लावून गेला. कारण, पुरुषी मनोवृत्तीतून स्त्री अत्याचाराने गाठलेले हिणकस टोक त्यातून दिसून येते. १९७२ मध्ये मथुरावर बलात्कार झाला. ती जगली. अत्याचाराच्या विरोधात तिने संघर्ष केला. त्यानंतर १९७३ मध्ये अरुणाला पुरुषी वृत्तीच्या नीच पातळीचा सामना करावा लागला. दिसायला सुंदर, कर्तव्यदक्ष असलेल्या अरुणाचे लग्न ठरले होते. तिच्यावरील अत्याचाराला सोहनलाल या परिचारकाला सफाईसाठी दिलेली तंबी हे क्षुल्लक कारण घडले. त्यावरून त्याने कुत्र्याच्या साखळीने मारहाण करीत तिला जोरात आदळले. अनैसर्गिक बलात्कार केला. त्यात तिच्या मेंदूच्या नसा फाटून तिचे डोळे गेले. मात्र, बलात्काराचे कलम लावले गेले नाही. केईएममध्ये ६७ व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. मारेकऱ्याला सात वर्षांची शिक्षा झाली आणि आता तो दिल्लीतील एका रुग्णालयात काम करीत आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचे टोक अरुणाच्या रूपाने दिसले. मरण जगत तिने ४२ वर्षे काढली. तिचे डोळे उघडे असायचे. मात्र, त्यात जीव नव्हता. तिच्यातर्फे इच्छामरणाची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली. मात्र, केईएमच्या परिचारिकांनी त्यास नकार देत तिच्या सेवासुश्रुषेची जबाबदारी शेवटपर्यंत स्वीकारली. न्यायपालिकादेखील तिला न्याय देऊ शकली नाही, अशी खंत डॉ. साखरे यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. रूपा बोधी-कुलकर्णी म्हणाल्या, कितीही कायदे आले असले तरी आजही परिस्थिती बदललेली नाही. बलात्काराच्या आरोपीला फाशीपेक्षा कमी शिक्षा तर नकोच. शिवाय, केवळ पोलीस, न्यायव्यवस्था, तुरुंग, कारागृह, शिक्षा, यालाच दोष देऊन चालणार नाही, तर शाळा स्तरापासूनच स्त्रीविषयी दृष्टिकोन घडवणे आवश्यक आहे. मुलांना तरुण होण्यापूर्वीच मनावर संस्कार केले पाहिजेत. मुलींविषयी आदर, समानता, आपलेपणा वाढून तिच्याविषयी विकृत भावना रुजू न देणे, याकडे लक्ष द्यायला हवे. अरुणावर बलात्कार झाला की नाही किंवा इतर कोणती कलमे लावली, याविषयी फारशी माहिती नाही. मात्र, त्याला खूनाचा प्रयत्न केवळ या कारणास्तव शिक्षा झाली. अरुणाला शेवटपर्यंत न्याय मिळाला नाही.
सामाजिक कार्यकर्त्यां सुवर्णा चालखुरे म्हणाल्या, अरुणाताईं मरणप्राय यातना सहन करून आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी त्यांनी जे प्रश्न निर्माण केले आहेत ते जुनेच आहेत. स्त्रियांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. स्त्रियांपेक्षाही समाजातील सर्व वर्गातील पुरुषांचे प्रबोधन कमी वयात होईल, अशी शैक्षणिक व्यवस्था असायला हवी.

pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल