नव्याने तयार होत असलेला सायन-पनवेल महामार्ग जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्याच्या प्रयत्नाला सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आले नसल्याने हा मार्ग आता खुला करण्यासाठी आणखी पंधरा दिवस लागणार आहेत. त्यामुळे हा मार्ग खुला होण्यासाठी आता जुलै महिना उजाडणार आहे. कामोठे, तळोजा आणि उरण फाटय़ाजवळील उड्डाण पुलांची कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याने हा महत्त्वाकांक्षी मार्ग वाहतुकीस खुला करण्यास अडचण आली आहे. तरीही या मार्गाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
मुंबईतून गोवा-पुणेकडे जाणाऱ्या वाहन चालकांना वाहतुकीच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या सायन-पनवेल महामार्गाचे सीमेंट काँक्रीटीकरण आणि रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास २३ किलोमीटर लांबीचा हा मार्ग ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ तत्त्वावर उभारण्यात येत असून त्यावर १२२० कोटी रुपये खर्च केला जात आहे. त्यासाठी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेलापूर खिंडीचेदेखील रुंदीकरण व उंचीचे  काम करण्यात आलेले आहे. हा रस्ता पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने केला होता. पण कामोठे, तळोजा आणि उरण फाटय़ाजवळील उड्डाण पुलाचे काम अद्याप शिल्लक असल्याने हा पूल तूर्त वाहतुकीस खुला केला जाणार नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याचप्रमाणे काही ठिकाणी अंडरपास बांधण्याची कामे बाकी आहेत. आघाडी सरकारला फील गुड देणारा हा मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या मार्गातील सानपाडा, शिरवणे, मानखुर्द, कळंबोली येथील उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली असून नेरुळ, सीबीडी, कंळबोली येथे असलेल्या बॉटल नेकमुळे काही प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याचे उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले. गत वर्षीपेक्षा मात्र खूप मोठा रिलीफ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या मार्गावरून दिवसाला दीड लाख वाहतूक येजा करीत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात बिझी मार्ग म्हणून हा मार्ग ओळखला जातो. या मार्गावर होणारे अपघात पाहता त्यासाठी संरक्षण कुंपन बांधण्याची कामेदेखील करावी लागणार आहेत.
टोलनाक्याचे काम जोरात
खारघर स्पेगॅटी येथे टोलनाका बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. या टोलला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोध केला आहे. त्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर बैठक आहे. पनवेल तालुक्यातील वाहन चालकांना या टोलमधून सूट मिळाल्यानंतर ते माघार घेण्याची शक्यता आहे. पण या मार्गावरून पुणे, गोव्याकडे जाणाऱ्या मुंबईकरांना टोल हा भरावा लागणार आहे. हा टोल विधानसभा निवडणुकीनंतर सुरू करणार की अगोदर, याबाबत सांशकता आहे. पण करोडो रुपये खर्च केलेला कंत्राटदार मात्र या वसुलीसाठी उतावीळ आहे. त्यामुळे मुंबईबाहेर पडल्यानंतर दोन मोठय़ा टोलधाडींना सामोरे जावे लागणार आहे हे निश्चित. याशिवाय पनवेल इंदापूर मार्गाचे देखील काम होत असल्याने त्याचा टोल गोव्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना भरण्याची सवय लावावी लागणार आहे.