बॉश कंपनीतील प्रणाली रहाणेवर रॅगिंगमुळे ज्याप्रमाणे आत्महत्येची वेळ आली तशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रॅगिंग विरोधात जनजागृतीची गरज आहे, असे मत येथील के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश कडवे यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयातील सभागृहात स्थापत्य अभियांत्रिकीच्या पुढाकारातून तसेच संगणक विभागाच्या सहकार्याने रॅगिंग संबंधी जनजागृती आणि काळा दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यशाळेत प्रा. कडवे बोलत होते. व्यासपीठावर प्रणालीचे वडील प्रदीप रहाणे, अनिल नेवासकर, दिलीप तुपे, अशोक सोनवणे आदी उपस्थित होते.
रॅगिंगमुळे आत्महत्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शासनाने हे थांबविण्यासाठी अधिक कठोर कायदे करण्याची तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्त्रियांवरील अत्याचाराबद्दल प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे नेवासकर यांनी सांगितले. याप्रसंगी स्त्रीभ्रूण हत्त्या, रॅगिंग यासंदर्भात होणाऱ्या कारवाईची पूर्वकल्पना विद्यार्थ्यांना देण्यात आली. रॅगिंग निषेधार्थ काळ्या पट्टीचे यावेळी वाटप करून प्रणालीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन यश नेवासकर यांनी केले.