महापालिकेत वादग्रस्त ठरलेल्या वाहतूक विभागाचे रस्ते आणि विद्युत खांब असे विभाजन करण्यात आले आहे. भांडेवाडीमधील सांडपाणी प्रकल्प (एसटीपी)चा पदभार असलेल्या कल्पना मेश्राम यांच्याकडे रस्ते विभागाचा प्रभार सोपविण्यात आले आहे तर विद्युत विभागाकडे विद्युत खांबांचे काम देण्यात आले आहे. निलंबित झालेले वाहतूक अभियंता नासिर खान यांचा अडथळा दूर होताच नव्याने विभाजनाचा निर्णय घेतल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
एलएडी आधारित वाहतूक सिग्नलच्या कंत्राटावरून वाहतूक विभागाचे तत्कालीन अभियंता नासीर खान आणि सत्तापक्षामध्ये चांगलीच जुंपली होती. एलएडी आधारित वाहतूक सिग्नल कंत्राट ज्या कंत्राटदाराला देण्यात आले तो सत्तापक्षातील एका पदाधिकाऱ्याच्या जवळचा असल्याचे सांगण्यात येत होते. सिग्नलचे काम वेळेत न केल्याने खान यांनी त्याचे कंत्राट रद्द करून त्याच्यावर दंडाची शिफारस केली होती. स्थायी समितीमध्ये हा विषय चांगलाच गाजला होता. त्यानंतर खान यांना निलंबित करण्याची शिफारस स्थायी समितीने केली होती. खान यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.
या प्रकरणानंतर त्यांच्या विरोधात अभियोग चालविण्याची कारवाई करण्यासाठी आयुक्त श्याम वर्धने यांनी मंजुरी दिली. याच कारणावरून खान यांना निलंबित करण्यात आले. वाहतूक विभागाकडे रस्त्यावरील रंगरंगोटी सोबत वाहतूक व विद्युत खांबाच्या देखरेखीचे काम होते. परंतु, आता या विभागाची विभागणी करण्यात आली. खान यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून ते जर निर्दोष सुटले तर त्यांच्यावर विद्युत खांब जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.