जेएनपीटी बंदर परिसराच्या सुरक्षेसाठी असलेल्या न्हावा-शेवा पोलीस ठाण्याची नवी इमारत सोनारी गावातील मैदानाच्या जागेत बांधण्यासाठी जेएनपीटीच्या वतीने मातीच्या भरावाचे काम सुरू करण्यात आलेले आहे. भरावाचे काम त्वरित थांबवावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा देत सोनारी ग्रामपंचायतीने १० नोव्हेंबर रोजी करळ फाटा येथे रास्ता-रोको करण्याचे पत्र दिलेले आहे. त्यामुळे नवीन न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचा प्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सोनारी गाव आहे. या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसमोर असलेल्या खेळाच्या मैदानाच्या ठिकाणीच जेएनपीटी न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या प्रस्तावित नव्या पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी पोलीस खात्याला जागा दिली आहे. यामुळे सोनारी ग्रामस्थांसाठी असलेले एकमेव मैदान हिरावले जाणार आहे. या प्रस्तावाला सोनारी ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. मात्र जेएनपीटीने आपला हट्ट न सोडता याच ठिकाणी मातीच्या भरावाचे काम सुरू केले आहे. या विरोधात सोनारी ग्रामपंचायतीचे सरपंच महेश कडू यांनी न्हावा-शेवा पोलिसांना पत्र देऊन १० नोव्हेंबरच्या आत चर्चा करा अन्यथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वात करळ फाटा येथे रास्ता रोको करू असा इशारा दिला आहे. या संदर्भात न्हावा-शेवा विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे यांच्याशी संपर्क साधला असता जेएनपीटीने पोलीस विभागाला पोलीस ठाण्यासाठी जागा दिलेली आहे. त्यामुळे त्याच जागेवर पोलीस ठाणे होणार आहे. मात्र सोनारी ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार करून ग्रामस्थांच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी, खेळासाठी मैदान उपलब्ध केले जाणार आहे. जेएनपीटीने तशी तयारी दाखविली असल्याचे बोराटे यांनी सांगितले आहे.