अनवट वाटांकडे पर्यटकांचा ओढा

शनिवार-रविवारला जोडून सुट्टी आली किंवा दिवाळीचे मुख्य दिवस संपले की, मुंबई-ठाणेकरांची पावले आतापर्यंत लोणावळा-खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर

शनिवार-रविवारला जोडून सुट्टी आली किंवा दिवाळीचे मुख्य दिवस संपले की, मुंबई-ठाणेकरांची पावले आतापर्यंत लोणावळा-खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर अशा ठरावीक पर्यटनस्थळांकडे वळत होती. मात्र आता दिवस बदलले असून मंडळी पर्यटनाच्या नवनवीन वाटा धुंडाळू लागली आहेत. या नव्या वाटांमध्ये अ‍ॅग्रो पर्यटन, वाइन पर्यटन आणि साहसी पर्यटन यांना प्रचंड वाढती मागणी आहे. विशेष म्हणजे परदेशी पर्यटकही या वाटांकडे मोठय़ा संख्येने आकर्षित होत आहेत.
अ‍ॅग्रो टुरिझम – शहरात राहणाऱ्यांना गावाचे आणि शेतीचे आकर्षण असते. त्यामुळे अ‍ॅग्रो टुरिझम ही संकल्पना गेल्या काही वर्षांपासून रूढ होत आहे. अ‍ॅग्रो टुरिझमसाठी कोकणपट्टा, अमरावती आणि ठाण्यातील शहापूर तालुक्यातील काही गावे, यांना पसंती मिळत आहे. बैलगाडी, घोडागाडी, नांगर धरण्याचा अनुभव, झोपडीतील निवास, भाकरी-भाजीचे जेवण आदी अनुभव शहरातील लोकांना घेता येतो. पिकांच्या माहितीपासून ते खतांच्या माहितीपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश या पर्यटनात असतो.
वाइन टुरिझम – भारताची नाफा व्हॅली म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये वाइन टुरिझमची गंगोत्री आहे. ‘सुला’सारख्या अनेक वायनरीज इथे आहेत. त्यामुळे वाइन पर्यटन हा पर्यटनातील स्वतंत्र प्रकार इथे सुरू झाला आहे. या प्रकारात वायनरीची पूर्ण टूर, वाइन टेस्टिंग, वाइनची माहिती, वाइन बनवण्याबाबतची माहिती वगैरे सर्व माहिती पर्यटकांना देण्यात येते. त्याशिवाय सुलासारख्या मोठय़ा वायनरीजमध्ये लोकांची राहण्याची सोयही असते.
वाइल्ड लाइफ टुरिझम – गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या पर्यटनाच्या या प्रकाराकडे आता सामान्यांचाही ओढा वाढत आहे. रेवदंडय़ाजवळ असलेल्या फणसाडपासून ते थेट ताडोबापर्यंत विविध अभयारण्यांत पर्यटकांचा राबता सुरू असतो. दिवाळीनंतरचा कालखंड हा तर वाइल्ड लाइफ टुरिझमसाठी उत्तम मानला जातो. त्यामुळे बहुतांश मुंबईकर जंगलांची वाट पकडतात. मात्र गेल्या एकदोन वर्षांपासून पर्यटकांसाठी या अभयारण्यातील अनेक नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. त्यामुळे अभयारण्यात जाण्यापूर्वी जंगलाचे कायदे समजावून घेणे महत्त्वाचे आहे.
अ‍ॅडव्हेंचर टुरिझम – भारत हा तरुणांचा देश असल्याने साहसी पर्यटनात सध्या वाढ होत आहे. या साहसी पर्यटनात वॉटर राफ्टिंगपासून व्हॅली क्रॉसिंगपर्यंत अनेक साहसी खेळांचा समावेश आहे. महाराष्ट्रात कोलाड येथे ‘व्हाइट वॉटर राफ्टिंग’, मालवण येथे ‘स्नॉर्केलिंग’, माथेरानमध्ये ‘व्हॅली क्रॉसिंग’, नाशिकमध्ये ‘ग्लायडिंग’, लोणावळा येथे ‘हॉट एअर बलुनिंग’ असे अनेक साहसी खेळ आहेत. त्यामुळे सध्या मुंबईतील लोकांचा ओढा या पर्यटनाकडे आहे.
* टूर ऑपरेटर कमी
आतापर्यंत धार्मिक सहली, परदेश पर्यटन, थंड हवेची ठिकाणे यांत गुंतून पडलेल्या आम्हा टूर ऑपरेटर्ससाठीही ही ऑफबिट पर्यटने नवीन आहेत. मात्र आम्हीही हळूहळू या सर्व प्रकारच्या पर्यटनांचा विचार करून आमच्या टूर्स आखत आहोत. लोकांना अनवट वाटा तुडवायला आवडतात आणि आम्ही त्या वाटा त्यांच्यासाठी सुखद करण्याचा प्रयत्न करतो.
कौस्तुभ जोशी, संचालक, हार्मनी टूर्स

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New tourism places

ताज्या बातम्या