डीजे खरेदी करण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणले नाही म्हणून सासरी होणाऱ्या छळास कंटाळून संजयनगर भागातील नवविवाहितेने रेल्वेखाली आत्महत्या केली. शहर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
शहरातील सम्राट ऑर्केस्ट्राचा चालक चंद्रसेन बन्सीधर गडकरी याच्याबरोबर १० महिन्यांपूर्वी संजयनगर येथीलच शरदभाऊ उजागरे यांची मुलगी लेखा हिचा विवाह झाला होता. लेखा ही पसंत नाही, तिला स्वयंपाक येत नाही तसेच नवीन डीजे आणण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणावेत म्हणून तिचा छळ केला जात होता. छळास कंटाळून तिने रेल्वेखाली आत्महत्या केली. लेखा हिच्या मृत्युची घटना समजताच संतप्त झालेल्या महिलांनी गडकरी याच्या घरावर दगडफेक केली. पण पोलीस लवकर आल्याने अनुचित प्रकार घडला नाही. दोन दिवसांपुर्वी लेखा हिला सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केली होती. ती आपल्या माहेरी आली होती. पण नंतर घरच्यांनी तिला पुन्हा सासरी पाठविले.
मयत लेखाचे वडील शरद उजागरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी बन्सीधर खंडू गडकरी, कमलाबाई बन्सीधर गडकरी, चंद्रसेन बन्सीधर गडकरी या तिघांना अटक केली आहे.

Story img Loader