कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही उपहासात्मक कादंबरी प्रचलित शिक्षणव्यवस्थेवरच केवळ प्रकाश टाकत नाही, तर ती भारतीयांच्या रोमारोमांत भिनलेलं मागासलेपण, भ्रष्ट आचारविचार, त्यांची दांभिकता आणि इरसालपणाचंही खुसखुशीत दर्शन घडवते. व्यवस्थेला काहीही अभिप्रेत असो- ती आपल्या सोयीनं कशी वाकवायची, सरकारी योजनांची पूर्तता कागदोपत्रीच कशी करायची, आणि त्यासाठी आलेला पैसा कसा जिरवायचा, हे कुणीही भारतीयांकडून शिकावं. गंमत म्हणजे याचं कुणालाच सोयरसुतक नाही. ना सरकारला, ना विरोधी पक्षांना, ना जनतेला. ‘निशाणी डावा अंगठा’मध्ये रेखाटलेलं हे वास्तव विनोदी ढंगानं हसत-हसवत संवेदनशील मनांना अस्वस्थ अन् अंतर्मुख करतं. पुरुषोत्तम बेर्डे यांनी त्यावर बनवलेला चित्रपट आणि आता डॉ. मंगेश बनसोड यांनी रूपांतरित व दिग्दर्शित केलेलं नाटक ही माध्यमांतरंही कादंबरीतलं वास्तव साकारण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाली आहेत.
काही वर्षांमागे देशभर सरकारी पातळीवर प्रौढ साक्षरता अभियान राबविण्यात आलं. त्याचं फलित शतप्रतिशत झाल्याची टिमकी वाजवण्यात आली तरी ते राबविणाऱ्या मंडळींचे आणि त्यात सहभागी कथित प्रौढ साक्षरांचे अनुभव याच्या नेमके उलट आहेत. ही वस्तुस्थिती मांडणारी रमेश इंगळे उत्रादकरांची कादंबरी- ‘निशाणी डावा अंगठा’! गावोगावच्या ज्या शिक्षकांना वेठीस धरून हे महाअभियान राबवले गेले, त्यांच्यासह या अभियानाशी संबंधित समस्त मंडळींनी सरकारच्या डोळ्यांत कशी धूळफेक केली, हे या कादंबरीत वाचायला मिळतं. सरकारी योजना म्हटल्यावर तीत आपल्याला कुठं ओरपण्यासारखं आहे, याचा अभ्यास सर्वप्रथम ती राबवणारी यंत्रणाच करते. सर्वशिक्षा अभियानाचंही तसं न होतं तरच नवल!
गावागावांतून हे अभियान राबवण्याचं परिपत्रक आल्याबरोबर आधीच शाळेत शिकवण्याबाबतीत उल्हास असलेल्या रं. भा. डुकरे या शिक्षकानं ही संधी साधायचं ठरवलं. साक्षरता अभियानाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता (पूवेका) म्हणून त्यानं आपलं नाव देऊन टाकलं. म्हणजे आता रोज शाळेत जायची कटकट नको. शिकवण्याचं झंझट नको. सबंध दिवस मस्तपैकी उंडारायचं. तशात डुकरेचं नुकतंच लग्न झालेलं. तेव्हा यानिमित्तानं बायकोच्या सहवासाचा अखंड लाभ मिळेल, या खुशीत तो ‘पूवेका’ बनतो.
प्रत्यक्षात त्याला करायचं काहीच नव्हतं. गावोगाव हिंडायचं, तिथल्या शाळांतून रात्रीचे प्रौढ साक्षरता वर्ग भरताहेत ना- हे तपासायचं, त्याचे अहवाल तयार करायचे आणि वरिष्ठांना पाठवायचे. बस्स! हे सारं अर्थात कागदोपत्रीच! गावोगावचे असे अनेक ‘डुकरे’ फुकटच्या फाकट सरकारी पैशांवर मजा मारता येईल, या विचारानं आपण खूप महत्त्वाचं काम करतो आहोत असा देखावा निर्माण करण्यात गढून गेले. त्यांचे वरिष्ठही बोरूबहाद्दरच. तेही होता होईतो त्यांना पाठीशी घालणारे. या झमेल्यात आपल्यालाही काही चिरीमिरी सुटेल, हे बघणारे. गावात पोरांची शाळाच भरताना मुश्कील; तिथं प्रौढ साक्षरता वर्ग कुठले भरायला?
सगळंच नाटक! मेक बिलिव्ह! आम्ही वर्ग घेतले, तुम्ही शाळेत शिकलात. अभियानाच्या प्रगतीचे अहवाल वेळच्या वेळी सरकारदफ्तरी दाखल. आणि गंमत म्हणजे या साऱ्या बनावात सबंध गाव सामील! त्यांनी प्रौढ नवसाक्षरांच्या परीक्षेचं नाटकही हुबेहुब वठवलं. परिणामी सावरगाव देशातील साक्षरता अभियानात सर्वप्रथम येतं. ढोल-ताशे, लेझीम, मिरवणुकीचा जल्लोष. प्रमुख पाहुण्यांनाही या जल्लोषात ओढल्यावर त्यांना वास्तवाचं भान कसं येणार? सगळीकडून व्यवस्थित फिल्डिंग लावलेली! साक्षरता अभियान की जय हो!!       मूळ कादंबरीवर आधारीत नाटय़रूपांतर व दिग्दर्शन केलं आहे डॉ. मंगेश बनसोड यांनी. हे करताना त्यांनी थोडंसं स्वातंत्र्य घेतलेलं आहे. मुक्तनाटय़ स्वरूपातल्या या नाटकात त्यांनी लोककलांचाही वापर केला आहे. सूत्रधार-निवेदक तसंच लोककलांच्या वापरातून त्यांनी नाटकाची गोष्ट पुढं नेली आहे. सुरुवातीला रं. भा. डुकरे या ‘पूवेका’ची कहाणी मांडता मांडता पुढे ती आपसूक प्रौढ साक्षरता अभियानाकडे आणि त्याच्या एकूणच बोजवाऱ्याकडे वळली आहे. परिणामी कादंबरीत जसा डुकरे हा केन्द्रस्थानी आहे, तसं नाटकात होत नाही. सर्वशिक्षा अभियानाच्या निमित्तानं शिक्षणव्यवस्थेची एकूण दैना, किडलेली सरकारी यंत्रणा, मागासलेले, पण इरसाल गावकरी, अभियानाचा देखावा करताना संबंधितांची होणारी ससेहोलपट, त्यातून त्यांनी वेळोवेळी हिकमतीनं काढलेले नाना मार्ग आणि अखेरीस सरकार व अभियानास चुना लावण्यात त्यांना आलेलं यश.. असा हा नाटय़प्रवास घडतो. नाटकाची रचना करताना गावकऱ्यांच्या तसंच शिक्षकांच्या इरसालपणाची मात्रा अंमळ जास्त झाली आहे. त्यामुळे नाटकाच्या हेतूला काहीशी बाधा पोचते. शिक्षणाधिकारी काझींचा परिचय करून देणाऱ्या कव्वालीचं (ती उत्तम असली तरीही!) नेमकं प्रयोजन कळत नाही. काही वेळा प्रत्यक्ष रंगमचावर घटना घडूनही नंतर तिचा पुन्हा अन्वय निवेदनातून सांगण्याची काहीएक गरज नाही. उदा. बौद्धवाडय़ात साक्षरता अभियान अत्यंत प्रामाणिकपणे राबवलं जात असल्याचा प्रसंग दाखवल्यावर नंतर अन्य पात्रांच्या बोलण्यातून त्यामागची पाश्र्वभूमी कथन करण्याची आवश्यकता नव्हती. तसंच नोकरी करणाऱ्या आणि न करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न, त्यांना न मिळालेलं स्वातंत्र्य यासंदर्भातलं एका शिक्षिकेचं स्वगतही असंच अनाठायी वाटतं. त्यांचं म्हणणं सत्य असलं तरी ते नाटकातून टोकदारपणे आलेलं नाही. परिणामी हे स्वगत ठिगळासारखंच वाटतं. हे झालं आशयाच्या अंगानं. पण सादरीकरणातही काही त्रुटी जाणवतात. उदा. बऱ्याचदा पात्रं रंगमंचावर एका रांगेत उभी राहून एकमेकांशी बोलतात. हे अत्यंत चुकीचं आहे. त्यातून त्या प्रसंगांचं बेतलेपण जाणवतं. दुसरी खटकणारी गोष्ट म्हणजे नाटकाच्या प्रारंभी गण सादर करणाऱ्या मंडळींमध्ये ऊर्जेचा अभाव जाणवला. खरं तर पहिल्या एन्ट्रीलाच कलावंतांनी नाटकाचा ताबा घ्यायला हवं, तरच प्रेक्षक त्यात मनानं सामील होतो. माणसांचे एकेक इरसाल नमुने पेश करण्याच्या नादात साक्षरता अभियानावरचं हे नाटक आहे, हे पूर्वार्धात काहीसं दुर्लक्षिलं गेलंय. या मानवी नमुन्यांतून प्रेक्षकांचं रंजन होत असलं, तरी नाटकाच्या एकूण परिणामात त्यानं बाधा येते. लेखक-दिग्दर्शक मंगेश बनसोड पात्रांच्या प्रेमात पडल्यानं अनवधानानं असं घडलं असावं. या झाल्या त्रुटीच्या बाजू. परंतु नाटकात जमेच्या बाजूही खूप आहेत. अचूक पात्रनिवड हे या नाटकाचं बलस्थान आहे. त्यातही सगळ्या पात्रांनी वऱ्हाडी बोलीचा लहेजा इतक्या सहजतेनं आणि तिच्या अस्सल खुमारीसह अचूक पकडला आहे, की त्याकरता त्यांना शंभरपैकी दोनशे मार्कस् नक्कीच द्यायला हवेत. ही अस्सल बेणी तिकडून थेट पार्सल मागवली असावीत असंच वाटतं. त्यांचं दिसणं, वागणं, व्यक्त होणं- सारंच लाजवाब. प्रत्येक पुरुष व स्त्रीपात्राची अंगकाठी लक्षात घेऊन त्यांच्या लकबी, वावर, वागणं-बोलणं यावर दिग्दर्शकानं मेहनत घेतल्याचं जाणवतं. कलाकारांनीही त्याचं चीज केलं आहे. साक्षरता अभियानाचं भजं करण्यात सगळ्यांनीच कसा हातभार लावला, हे नाटकाच्या उत्तरार्धात गतिमानतेनं येतं. मात्र, प्रौढ नवसाक्षरांच्या परीक्षेचा प्रसंग प्रत्यक्ष रंगमंचावर घडता तर आणखीनच मजा आली असती. त्याच्या केवळ उल्लेखातून प्रत्यक्षातलं खुमासदार ‘नाटय़’ नाटकानं गमावलं आहे. तो नाटकाचा परमोत्कर्षबिंदू ठरला असता. असो.
नविद इनामदार यांनी नेपथ्यात पाश्र्वभागी योजलेली भल्यामोठय़ा कोऱ्या पाटीची नुसतीच रिकामी फ्रेम, पेन्सिलींचे कटआऊट्स, ऱ्हस्व-दीर्घ, इकार-उकार रेखांकित मोढे यांतून नाटकाचा विषय सूचकतेनं व्यक्त होतो. मंगेश बनसोड यांच्या रचनांकरता संगीतकार आशुतोष वाघमारे यांनी गण, गोंधळादी लोकसंगीताचा केलेला वापर नाटकाची रंगत वाढवतो. अनिल सुतार यांच्या नृत्य-दिग्दर्शनानं ते अधिकच खुलतं. पूजा गायकवाड यांची पात्रानुरूप वेशभूषा आणि उलेश खंदारे यांनी रंगभूषेतून पात्रांचं सूचित केलेलं सामाजिक-आर्थिक स्थान नाटकाच्या निर्मितीमूल्यांत भर घालतं.  
भारत गणेशपुरे यांनी निरनिराळ्या भूमिकामधलं वैविध्य अचूक टिपलं आहे. त्यांचं सरपंचाच्या भूमिकेतलं शब्द खात बोलणं तर अफलातूनच. जयंत गाडेकर यांनीही त्यांच्या वाटय़ाची सगळी पात्रं छान रंगवलीत. त्यांचा हातोळे ड्रायव्हरही लक्षणीय. पण त्याचं दारूडय़ाचं बेअरिंग काहीसं कृत्रिम वाटतं. काझीसाहेब झालेल्या प्रदीप सरवदे यांनी सरकारी अधिकाऱ्याचं बनचुकेपण आणि निगरगट्टपणा संयमित, पण परिणामकारकतेनं व्यक्त केलाय. तृप्ती नार्वेकरांनी गावंढी नर्मदा यथार्थपणे साकारलीय. शिल्पा ढोक यांनीही आगाऊ केंप्र बाई छान वठवलीय. कुणाल मेश्राम यांचा शाळिग्राम हे अस्सल गावठी बेणं आहे. प्रमोद कदम, शेषपाल गणवीर, स्वप्नील काळे, राम आश्रोबा, कोमल खामकर, योगेश मरकडे आणि स्मिता प्रदीप या सर्वाचीच कामं चोख झाली आहेत.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
ग्रामविकासाची कहाणी
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन