नागपुरातील मेट्रो प्रकल्पास तातडीने गती देण्याचे निर्देश शनिवारी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर सुधार प्रन्यास तसेच महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
नागपुरात मेट्रो प्रकल्प उभारणीची जबाबदारी नागपूर सुधार प्रन्यासवर सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पास आवश्यक ते नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत. दोन नाहरकत प्रमाणपत्र मिळायचे आहेत, अशी माहिती नासुप्र अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. ही दोन्ही ना हरकत प्रमाणपत्र आठवडय़ाभरात मिळतील. त्यासंबंधी पाठपुरावा करून प्रस्ताव पाठवावा व ही कामे वेळेत पूर्ण होतील, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी नासुप्र अधिकाऱ्यांना दिले. शहराच्या बाह्य़ भागासाठी मेट्रो रिजन योजनेत अनेक अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले. राज्य शासनाने प्रस्ताव थांबविले होते. त्यावर पाच प्रस्ताव तातडीने शासनास पाठविण्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
भांडेवाडी मलनिस्सारण प्रकल्पाची क्षमता ११० वरून २१० एमएलडी करण्यात आली. त्याचा अंतिम आराखडाही तयार आहे. आठवडय़ाभरात त्यावर निर्णय घेतला जाईल. बुधवार बाजार, सक्करदरा बाजार, मस्कासाथ व कॉटन मार्केट या बाजारांच्या विकासासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आले असून त्याचा आराखडा तयार केला जाईल. रुग्णालय तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीसंदर्भातही लवकरच निर्णय अपेक्षित आहे. शहराला पाणी पुरवढा करण्यासाठी २४ टाक्यांची गरज आहे. वीस टाक्यांची कामे सुरू असून त्यापैकी दहा टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. सहा टाक्या महिनाभरात पूर्ण होतील. चार टाक्यांसाठी निविदा काढली जाईल. चार टाक्या नागपूर सुधार प्रन्यास बांधणार आहे. नागपूर शहरात विविध ५२ पूल बांधण्याचे प्रस्ताव असून राष्ट्रीय महामार्गावरील पूल ते प्राधिकरण बांधेल. शहरातील पाच तलावांच्या सौदर्यीकरणासाठी केंद्रीय पर्यटन खात्याला प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
शहरात कन्व्हेंशन सेंटर तयार केले जाणार असून त्यासाठी वायुसेनेची हिंगणा टी पॉइंट व वर्धा मार्गावरील जागा, उप्पलवाडी या तीन जागांपैकी एक जागा निवडली जाईल. अंबाझरी बगिचात अहमदाबादच्या स्वामीनारायण मंदिरासारखा लेझर शो व लाईट अँड साऊंड शो साकारला जाईल. बीओटी तत्वानुसार विकास केला जाणार असून कायदेशीर बाबींच्या तपासणीअंती निविदा काढल्या जातील. सध्या सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामाची प्रगती व त्याचा अहवाल आल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यात नव्या सिमेंट रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.