नवी मुंबईत पुढील महिन्यात होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीसाठी युती व आघाडी करण्याचा शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांतील नेते कितीही प्रयत्न करीत असले तरी ही आघाडी व युती व्हावी अशी स्थानिक नेत्यांची इच्छा नाही. त्यामुळे शिवसेनेने सर्व प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दोन आठवडय़ांपूर्वी घेऊन ठेवल्या असून काही ठिकाणी कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपनेही रविवारी व सोमवारी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने मुलाखतींचा फार्स पूर्ण केला आहे. त्यामुळे चार प्रमुख पक्ष बाह्य़ा सकसावून निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झाले असून युती, आघाडीचे बाळकडू नेत्यांनी आम्हास पाजण्याच्या फंदात पडू नये असा एक प्रकारे संदेश दिला आहे. भाजप विधानसभा निवडणुकीत २७ प्रभागांत आघाडीवर असून १२ प्रभागांत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे ३९ आणि आणखी २१ प्रभाग भाजपला हवे आहेत. तेवढे देण्यास शिवसेना तयार नाही.
नवी मुंबई पालिकेच्या मतदानाला आजपासून २३ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात करण्यात येणार असून अपक्ष व शेकाप, बसपासारखे शहरातील छोटे-मोठे पक्ष उमेदवारी अर्ज भरून प्रचारासाठी मैदानात उरणार आहेत. पालिका निवडणुकीतील चार प्रमुख पक्ष मात्र बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सात एप्रिल रोजी एबी फॉर्म देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठ दिवसांनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी उडणार असून काही पक्षांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादीने तर नेरुळमध्ये रूपाली भगत, डी. डी. कोलते, अ‍ॅड. सपना गावडे, विशाल डोळस  आणि अशोक गावडे या सहा उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ वाढविला. माजी खासदार संजीव नाईक यांनी ४३ प्रभागांतील नाराजांची समजूत काढली असून कठीण काळात पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. या पक्षाचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांनी ऐरोली व बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आपल्या दोन मुलांवर सापोविली आहे. काँग्रेसने ६५ उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब केले असून दोन एप्रिल रोजी ती जाहीर केली जाणार आहे. शिवसेनेने १११ प्रभागांसाठी ५६२ उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या यादीला प्राधान्यक्रम दिला आहे. इतर पक्षांतून आलेल्या नगरसेवकांना उमेदवारीचे स्वप्न दाखविण्यात आल्याने त्यांना एकापेक्षा जास्त उमेदवारीचे अमिष देण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते नाराज असून शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनेते विजय नाहटा आणि खासदार राजन विचारे यांनी या यादीवर शेवटचा हात फिरवला असून ती मातोश्रीवर पाठविण्यात आली आहे. भाजपने जिल्हा निवड सामितीद्वारे रविवार व सोमवारी दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या मुलाखतींनंतर ही यादी पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठविण्यात येणार असल्याचे प्रदेश महासचिव प्रा. वर्षां भोसले यांनी स्पष्ट केले.
ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली भाईंदर पालिकेचे सभागृहनेते रोहिदास पाटील व जिल्हा नेते मनोज कोटक यांनी मुलाखती घेतल्या. या वेळी स्थानिक नेत्यांना दूर ठेवण्यात आले होते. युतीची राज्य स्तरावर चर्चा करण्याची तयारी करणाऱ्या दोन्ही पक्षांनी १११ प्रभागांचे फेरे पूर्ण केले आहेत. स्थानिक पातळीवर युतीच्या चर्चेची ही फेरी बुधवारी सुरू होणार आहे. या ठिकाणी निर्णय न झाल्यास राज्य स्तरावरील नेते निर्णय घेणार आहेत. आघाडी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण अनुकूल असले तरी राष्ट्रवादीचे नाईक त्याला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे आघाडीचा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडे पाठविण्यात आलेला नाही. राष्ट्रवादीने आघाडीबद्दलचे सर्वाधिकार नाईक यांना सोपविले आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रवक्ता अशीष कुलकर्णी यांच्याबरोबर नाईक यांची चर्चा होऊन काहीही निष्पन्न झालेले नाही. चारही प्रमुख पक्षांच्या पक्षश्रेष्ठींच्या मनात युती आघाडीचे मांडे असले तरी स्थानिक नेते ते पूर्ण करतील असे दिसून येत नाही.
काँग्रेस, युती व आघाडीतील बिघाडीला कारणीभूत?
काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांचा सेनेबरोबर असलेला घरोबा हा जगजाहीर असून हे आघाडी न करण्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख कारण असून भाजपनेही हाच मुद्दा पुढे केला आहे. सेनेने निवडणुकीच्या अगोदरच काँग्रेसच्या १३ उमेदवारांना निवडून देण्याचा विडा उचलला असेल तर युती करण्यात काय अर्थ असा भाजपचा सवाल आहे. हाच प्रश्न राष्ट्रवादीचा असून पाट एकाबरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर काँग्रेस करणार असेल तर ही आघाडी न केलेली बरी असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पावित्रा आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने हे प्रयोग केल्याचे पुरावे राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे आघाडी किंवा युती फिस्कटल्यास त्यामागे केवळ काँग्रेस हेही एक कारण असेल अशी चर्चा सुरू आहे.

रमेश बागवेंचा विदर्भीय धडा
काँग्रेसच्या वतीने नवी मुंबईच्या निवडणूक लढाईवर पाठविण्यात आलेले माजी मंत्री नारायण राणे वांद्रे येथील पोटनिवडणुकीत उतरल्याने काँग्रेसने माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांच्याकडे नवी मुंबईची जबाबदारी सोपविली असून त्यांनीही आघाडीचे प्रयत्न सुरू केले आहेत. निगरगट्ट आणि मतलबी असलेल्या येथील स्थानिक नेत्यांना आता बागवे विर्दर्भीय धडा शिकविणार आहेत. राणे यांच्यासारख्या खमक्या नेत्याला पाठ फिरताच वाकुल्या दाखविणारे काँग्रेसवासी बागवे यांच्याकडे कसे बघतात हे येणारा काळ ठरविणार आहे.

भाजप ६० जागांसाठी आग्रही
विधानसभा निवडणुकीतील भाजपाला मिळालेली टक्केवारी पाहता ६० प्रभाग हवे आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजप २४ प्रभागांत आघाडीवर आहे तर ऐरोलीत तीन प्रभागांत भाजपला पसंती आहे. १२ प्रभागांत भाजप दुसऱ्या क्रमांकावर असल्याने हे ३९ प्रभाग तर भाजपला हवे आहेत याशिवाय आणखी २१ अशा ६० प्रभागांची मागणी भाजपची आहे. ते देण्यास शिवसेना कदापि तयार होणार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्र तयारी सुरू केली असून राज्यस्तरावरील दोस्तीचा हात हा राजकीय मुत्सद्देगिरी असल्याचे मानले जात आहे.