राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आलेल्या आकृतिबंध रचनेला मान्यता मिळाल्यानंतर नवी मुंबई पालिकेची आस्थापना रचना मुंबई पालिकेच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये लिपिक म्हणून रुजू झालेले कर्मचारी आता पालिकेच्या प्रभाग अधिकारी पदावर विराजमान झाले आहेत. या रचनेमुळे त्यांच्या जागी साहाय्यक पालिका आयुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार आहे.
नवी मुंबई पालिकेचा व्याप वाढत असून कर्मचारी व अधिकारी संख्या कमी पडू लागली आहे. राज्यातील २६ महानगरपालिकांमध्ये आस्थापनेवर कमी खर्च करणारी नवी मुंबई पालिका आहे, पण आता हा गाढा कमी कर्मचाऱ्यांमध्ये खेचणे प्रशासनाला जड जाऊ लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने एक सेवा भरतीचा आकृतिबंद आराखडा तयार केला आहे. त्यात विद्यमान कर्मचाऱ्यांएवढे कर्मचारी मंजुरी मागण्यात आली आहे. सध्या पालिकेत दोन हजार ३०० कर्मचारी कायमस्वरूपी असून आठ हजार कंत्राटी कामगार आहेत.
कायमस्वरूपी कामगारात प्रशासनाने दोन हजार कामगारांची वाढ सुचविली आहे. त्यापैकी ५० टक्के कर्मचारीदेखील मंजुरी मिळाल्यास पालिका मुंबई पालिकेच्या धर्तीवर आस्थापना रचना करणार असून प्रत्येक प्रभागात साहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी नेमले जाणार आहेत. त्याचबरोबर अभियंता विभागातील कार्यकारी अभियंता प्रभाग विभागात रुजू होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक प्रभाग विभागात करणे शक्य होणार आहे. सध्या नागरिकांना अनेक तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मुख्यालयाचे खेटे झिजवावे लागत आहेत.
या रचनेत परिमंडळांची जबाबदारी उपायुक्त आयुक्तांवर सोपविण्यात येणार आहे. ती सध्या कायम आहे, पण यानंतर परिमंडळ संख्या वाढणार आहे. नवी मुंबईची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असून पुढील वर्षी ८९ ऐवजी १११ प्रभाग तयार होणार असून समस्या निवारण करण्यासाठी ही रचना फायदेशीर ठरणार आहे.

नवी मुंबई पालिकेच्या आकृतिबंद आस्थापना रचनेला लवकर नगरविकास विभागाची मंजुरी मिळणार असून पालिकेत टप्प्याटप्प्याने नोकरभरती केली जाणार आहे. दोन रुग्णालयांसाठी याअगोदर उमेदवारी अर्ज मागविण्यात आले असून शासनाच्या आकृतिबंद मंजुरीची वाट पाहत आहोत. त्यानंतर त्या उमेदवारांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मुख्यालयातील विभागांचे विकेंद्रीकरण करून नागरिकांना त्यांच्या घराजवळ सुविधा उपलब्ध करून देण्यावर पालिकेचा कटाक्ष राहणार आहे.
    -आबासाहेब जऱ्हाड, आयुक्त, नवी मुंबई पालिका