कल्याण-डोंबिवली शहरातील प्रवाशांना वाहतूक सेवा देण्यासाठी सुरू झालेल्या महापालिकेच्या परिवहन सेवने प्रवाशांना निवाऱ्यासाठी बसथांबेच उभारले नसल्याचे चित्र दिसत आहे. ‘केडीएमटी’च्या विविध मार्गावर दिवसभरात सरासरी ७० ते ७५ गाडय़ा धावत असल्या तरी त्या थांबण्यासाठी बसथांबेच उपलब्ध नसल्याने बस पकडण्यासाठी नेमके कुठे थांबायचे, असा प्रश्न प्रवाशांना पडलेला दिसतो. परिवहन सेवा सुरू झाली तेव्हा काही ठिकाणी थांबे उभारण्यात आले. त्यानंतर मात्र उपक्रमाची आर्थिक अवस्था केविलवाणी झाली. त्यामुळे उभारलेल्या थांब्यांची निगाच राखली गेली नाही. त्यामुळे काही ठिकाणी थांबे चोरीला गेले तर अनेक ठिकाणी केवळ सांगाडे उरले आहेत. ठरावीक ठिकाणी जुने थांबे असले तरी त्यांच्यावर अतिक्रमण झाले असून त्यावर बस क्रमांक, बसेसचे मार्ग अशा कोणत्याच गोष्टींचा पत्ता नाही. काही ठिकाणी बसथांबे नेमके कोणते हे ओळखणेसुद्धा प्रवाशांसाठी अवघड बनले आहे.
शहरातील विविध मार्गावर १२४ बसथांबे उभारण्यात आले होते. २६ जुलै रोजी आलेल्या प्रलयकारी पावसात यापैकी बहुतांश थांब्यांची अवस्था वाईट झाली. त्यानंतर त्यांच्याकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही. या थांब्यांऐवजी भंगाराचे सापळे उभे असल्यासारखे चित्र काही ठिकाणी निर्माण झाले. त्यामुळे अनेक ठिकाणचे बसथांबेच चोरीस गेल्याच्या घटना घडल्या. अनेक वर्षे देखभाल-दुरुस्ती नाही, रंगरंगोटी नाही आणि २४ तास भिकारी, गर्दुल्ले आणि फेरीवाल्यांचा राबता यामुळे हे थांबे प्रवासी वापरासाठी पूर्णपणे बंद झाले.
जाहिरातींचाही उपयोग नाही
सध्या कल्याणच्या एसटी आगार, कल्याण रेल्वे स्टेशनच्या समोरची मोकळी जागा, कपोते वाहनतळ, शिवाजी चौक, मुरबाड रोड, आग्रारोड, डोंबिवली रोड, डोंबिवलीतील स्टेशन परिसर अशा भागांमध्ये बस थांब्यांचे सांगाडे पाहायला मिळत असून त्याचा प्रवाशांना कोणताच उपयोग होत नाही. या थांब्यांवर जाहिरात करून त्यातून येणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून या बसथांब्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी एका संस्थेची नियुक्ती २००८ मध्ये करण्यात आली होती. मात्र ही जाहिरात संस्था बसथांब्यांवर जाहिराती करत असली तरी थांब्यांची अवस्था मात्र जैसे थे अशीच आहे. परिवहन प्रशासनाच्या वतीने या संस्थेला या प्रकरणी वारंवार सूचना देऊनही जाहिरात संस्था याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.  ऑगस्ट २०१४ पर्यंत या संस्थेचे कंत्राट संपत असून त्यानंतर याकडे लक्ष देता येऊ शकेल, असे परिवहन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
२४० बसथांबे प्रस्तावित..
केडीएमटीचे जुने १२४ बसथांबे असून नव्याने ११९ बसथांबे विकसित करणे प्रस्तावित आहेत. नवे बसथांबे आणि तीन मोठे आगार यासाठी केंद्र शासनाकडून सुमारे १४ कोटींचा निधी मंजूर असून त्यातून ही कामे केली जाणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबर २०१४ पर्यंत बसथांब्यांचे नूतनीकरण होऊ ते प्रवाशांसाठी उपलब्ध होऊ शकतील, अशी माहिती कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेचे महाव्यवस्थापक सुधीर राऊत यांनी दिली.