‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त आज विशेष मोहीम
दिल्ली बलात्काराच्या दुर्दैवी घटनेनंतर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात जगभर सुरू असलेली ‘वन बिलियन रायझिंग’ ही मोहिम ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त गुरुवारी पुण्यात राबविण्यात येणार आहे.
महिलांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे ‘चला, निघा (सायंकाळी) सातनंतर घराबाहेर..’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ स्त्री-वादी कार्यकर्त्यां विद्या बाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी साधना दधीच, अलका पावनगडकर, संयोगिता ढमढेरे, मिलिंद चव्हाण आदी उपस्थित होते.
स्त्रिया व मुलींवरील हिंसा खपवून घेणार नाही, पितृसत्ताक मानसिकता आणि चालीरितींना खतपाणी घालणार नाही, स्त्रियांवर अवमान, मानहानी, हिंसा, दडपशाही लादू देणार नाही, असा निर्धार करत शहरातील हजारो स्त्रिया सायंकाळी सातनंतर घराबाहेर पडणार आहेत. ही मोहीम सायं. ७ ते ९ या वेळेत महात्मा फुले मंडईपासून संभाजी उद्यान या मार्गावर काढण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त महिलांनी आपल्या आवडीच्या पोशाखात या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.