कोयना धरण क्षेत्रात पावसाची दिवसा ओढ, तर रात्रीचा जोर असा प्रकार सुरू असून, धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेबारा फुटांपर्यंत उचलून कोयना नदीपात्रात एकंदर ६३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कायम आहे. मोठय़ाप्रमाणात होत असलेल्या या विसर्गाबरोबरच धरणाखालील कराड व पाटण तालुक्यात पावसाची संततधार अखंड सूरू असल्याने कृष्णा, कोयना नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, पाटणनजीकचा संगमनगर धक्का पूल तसेच मेंढेघर, मुळगाव आदी पूलही पाण्याखाली गेल्याने सुमारे ७२ गावे व वाडय़ावस्त्यांचा अंशत: व पूर्णत: संपर्क तुटलेलाच आहे.  संभाव्य पूरस्थिती गांभीर्याने घेऊन प्रशासन सतर्क असून, सध्या अगदीच नदीकाठावरील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्वच पाणी साठवण प्रकल्प भरभरून वाहिले आहेत. चालू हंगामात कोसळलेल्या सततच्या जोमदार पावसाने खरिपाच्या हंगामावर ओल्या दुष्काळाची छाया असून, पावसाची उघडीप खरिपाला जीवदान देणारी ठरणार असल्याने बळीराजा हवालदिल आहे. कोयना धरणात आवक होणाऱ्या पाण्याच्या बरोबरीने सध्या ६२ हजार क्युसेक पाण्याचा कोयना नदीत विसर्ग करण्यात येत असल्याने धरणाची जलपातळी व पाणीसाठा काहीसा कमी होत चालला आहे. तर, पूरसदृश स्थितीत वाहणाऱ्या कृष्णा, कोयना नद्यांची सरासरी पाणी पातळी ३४ फुटावर असून, कराडजवळ या नद्यांची इशारा पाणीपातळी ४५ फुटांवर असल्याने तूर्तासतरी पूर अथवा महापुराचा धोका संभवत नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
चालू हंगामात कोयना धरणामध्ये जवळपास ८१ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत गेल्या ३५ तासात धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात २३४ एकूण ३,३३२, महाबळेश्वर विभागात १९७ एकूण ३,६९७ तर, नवजा विभागात सर्वाधिक २२७ एकूण ४,१७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणाची पाणीपातळी २,१५० फूट १० इंच राहताना पाणीसाठा ८८.९६ म्हणजेच सुमारे ८५ टक्के आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे दरवाजे आणखी काही फूट उचलून धरणातून कोयनानदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितले.