..महापालिका आयुक्तांना उशिरा शहाणपण सुचले
० सर्वसामान्य रुग्णांमध्ये समाधान
० हाय प्रोफाइल रुग्ण अडचणीत
० पोलीसही अडचणीत
बडे गँगस्टर, हाय प्रोफाइल गुंड, व्हीआयपी कैद्यांसाठी नंदनवन ठरू लागलेल्या वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात कोणत्याही स्वरूपाच्या कैद्यांना प्रवेश देऊ नये, असा फतवा अखेर आयुक्त भास्कर वानखेडे यांनी काढला आहे. नवी मुंबईतील गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना सेवा पुरविण्यासाठी उभारण्यात आलेले ३०० खाटांचे हे रुग्णालय गेल्या काही वर्षांपासून तळोजा कारागृहातील आजारी कैद्यांसाठी नंदनवन बनू लागले होते. कायद्याने आवश्यक असा कोणताही ‘कैदी विभाग’ (प्रीझनर्स वार्ड) अस्तित्वात नसतानाही या रुग्णालयात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी, डी. के. राव, सुनील घाटे असे बडे गँगस्टर तर शिशिर धारकर, ओम कलानी असे अतिमहत्त्वाचे कैदी आजारांवर उपचार करण्यासाठी वरचेवर हजेरी लावत होते. त्यामुळे या रुग्णालयातील कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. विशेष म्हणजे, या रुग्णालयातून काही कैद्यांनी पळ काढल्याने येथील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्नही गंभीर बनला होता. एवढे सगळे घडून गेल्यानंतर महापालिका प्रशासन ढिम्म होते. अखेर उशिरा का होईना आयुक्त वानखेडे यांनी रुग्णालयात कैद्यांना प्रवेशबंदीचा फतवा काढला आहे.
राज्यातील मोठय़ा कारागृहांपैकी एक असलेल्या तळोजा कारागृहात अतिशय गंभीर गुन्हय़ांमधील बडे आरोपी बंद आहेत. वैद्यकीय तपासणी तसेच आजारांवरील उपचारांसाठी येथील कैद्यांना महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालय जवळचे आणि सोयीचे पडते. वाशी रुग्णालयात कैदी विभाग अस्तित्वात नाही. शासन मानकांनुसार कैदी विभागात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवणे बंधनकारक असते. तसेच या विभागात सीसी टीव्ही कॅमेरे बसविले जावेत, असाही दंडक आहे. वाशी रुग्णालयात कायद्याने प्रमाणित असा कैदी विभाग नाही. त्यामुळे या सुविधाही येथे नाहीत. असे असतानाही बडय़ा, हाय प्रोफाइल कैद्यांना दाखल करून घेण्याचे सोयीचे ठिकाण म्हणून वाशी रुग्णालयाचा बिनधोकपणे वापर सुरू होता.

हाय प्रोफाइल रुग्णांचे नंदनवन
तळोजा कारागृहातील रुग्णांना वाशी रुग्णालयात तपासणीसाठी आणले जावे, असे आदेश मध्यंतरी तत्कालीन महापालिका आयुक्त विजय नहाटा यांनी काढले होते. मात्र, बडय़ा कैद्यांना या ठिकाणी दाखल करून घेत नहाटा यांच्या आदेशाला रुग्णालय व्यवस्थापनाने अक्षरश: केराची टोपली दाखवली. गँगस्टर तसेच हाय प्रोफाइल गुंडांना ज्या पद्धतीने या ठिकाणी दाखल करून घेतले जात होते, ती पद्धत वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरली होती. कोटय़वधी रुपयांची बँक बुडविणे तसेच १२०० कोटींचा हवाला देणे, असे गंभीर आरोप असणारा पेण-अर्बन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी शिशिर धारकर याला रुग्णालयातील वातानुकूलित अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आल्याने मध्यंतरी मोठा गहजब उडाला होता. काही महिन्यांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन डी. के. राव याला या रुग्णालयात दाखल करण्यात आले. राव रुग्णालयात दाखल असताना त्याच्या वाढदिवसाची जोरदार पार्टी रुग्णालयातच आयोजित करण्यात आली होती. डॉक्टर, कर्मचाऱ्यांनीही राव याची मेजवानी झोडल्याची तेव्हा चर्चा होती. तळोजा कारागृहात दाखल असलेल्या अरुण गवळी याला अधूनमधून रुग्णालयात तपासणीसाठी आणले जाते. पप्पू कलानीचा मुलगा ओम कलानी यालाही या ठिकाणी काही दिवस उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नवी मुंबईतील काही वादग्रस्त बिल्डर मंडळी अटकेत असताना महापालिकेच्या अतिदक्षता कक्षात ‘विश्रांती’ घेत असत. रुग्णालयात पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्याने आरोपी पळून जाण्याचे प्रकारही येथे घडले. एवढे सगळे घडत असतानाही धोरणलकव्याने ग्रासलेले आयुक्त वानखेडे कोणतीही कारवाई करत नव्हते. दरम्यान, सिडकोतील लिपिक खूनप्रकरणी अटकेत असलेल्या पाटील नावाच्या आरोपीने रुग्णालयातून धूम ठोकल्याने पोलीस आणि रुग्णालय व्यवस्थापन दोन्ही वादात सापडले होते. या प्रकारानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका आयुक्तांनी अखेर यापुढे तळोजा कारागृहातील रुग्णांना वाशी रुग्णालयात दाखल करून घेणार नाही, असा फतवा काढला आहे.