मुंबई-नाशिक महामार्गाला छेदणाऱ्या ठाणे शहरातील तीन हात नाका, नितीन आणि कॅडबरी जंक्शन या तिन्ही मुख्य चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेने येथील वाहतुकीत मोठे बदल करण्याचा विचार सुरू केला असून येत्या काही दिवसांत हे बदल प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहेत. या बदलासाठी तिन्ही मुख्य चौकातील सेवा रस्ते (सव्‍‌र्हिस रोड) बंद करण्यात येणार असून या रस्त्यांवर जाण्यासाठी महामार्गाच्या मधोमध मार्गिका तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पाचपाखाडी भागात राहणारा रहिवासी आपल्या वाहनाने मुंबईहून घरी परतत असेल तर त्यांना तीन हात नाक्याऐवजी नितीन जंक्शनला वळसा घालून महामार्गावरील मार्गिकेमधून सेवा रस्त्यामार्गे घरी जावे लागणार आहे. हा वाहतूक बदल वरवरचा सुधारणावादी वाटत असला तरी, तो रहिवाशांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गाला छेदणाऱ्या ठाणे शहरातील तीन हात नाका, नितीन आणि कॅडबरी जंक्शन या तिन्ही मुख्य चौकात गेल्या काही वर्षांपासून मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या तिन्ही चौकातून दर दिवशी प्रतितास सुमारे २० ते २५ हजार वाहनांची ये-जा सुरू असते. काही वर्षांपूर्वी या चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाण पूल उभारण्यात आले. असे असले तरी, दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे या तिन्ही चौकात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे तीन हात नाका, कॅडबरी जंक्शनवरील सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरू लागली आहे तर नितीन जंक्शनवर सिग्नल यंत्रणाच नसल्यामुळे येथील वाहतुकीचा बट्टय़ाबोळ झाला आहे. मध्यंतरी, वर्तुळाकार (रोटरी) पद्धतीने वाहतूक बदलाचा प्रयोग करण्यासाठी नितीन जंक्शनवरील सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली. ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. सकाळ- संध्याकाळ गर्दीच्या वेळी या तिन्ही चौकात मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र नित्याने पाहावयास मिळते. याच पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेने या तिन्ही चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येथील वाहतुकीत बदल करण्याचा विचार सुरू केला होता. त्यासाठी एका खासगी कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. या कंपनीने कॅमेऱ्यांच्या आधारे तिन्ही चौकातील वाहतुकीचा सविस्तर अभ्यास करून त्यासंबंधीचा अहवाल महापालिकेस सादर केला आहे. यासंबंधी महापालिका आयुक्त असीम गुप्ता आणि शहरातील वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली असून त्यामध्ये दोन्ही विभाग काही निष्कर्षांपर्यंत पोहचले आहेत. त्यानुसार, वाहतूक बदलांचे नियोजन करण्यात आले असून जुलै महिन्याच्या अखेरीस तीन हात नाका येथे सात दिवस प्रायोगिक तत्त्वावर हा बदल राबविण्याचा महापालिकेचा विचार आहे. मात्र, हा बदल वरवरचा सुधारणावादी वाटत असला तरी तो रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. तसेच ऐन पावसाळ्यात हा बदल आणखी कटकटीचा होण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

नेमका कसा असेल बदल
तीन हात नाका येथील चौकात सात दिवस प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्याचा महापालिकेचा विचार असून या बदलामध्ये सातऐवजी पाच सिग्नल करण्यात येणार आहेत. मात्र सिग्नलचा कालावधी कमी होणार नाही. विशेष म्हणजे, या बदलासाठी आरटीओ येथून येणारा सेवा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे तर गुरुद्वार, वाहतूक शाखा आणि इटरनिटी येथील सेवा रस्ते येणाऱ्या वाहनांसाठी खुले राहणार आहेत. मात्र सिग्नलवरून जाणाऱ्या वाहनांनासाठी हे सेवा रस्ते बंद राहणार आहेत. त्यामुळे पाचपाखाडी, लुईसवाडी, ज्ञानसाधना तसेच अन्य भागात राहणाऱ्या रहिवाशांसाठी हा प्रवास डोकेदुखीचा ठरणार आहे. सिग्नलजवळ सेवा रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना एलबीएस मार्गावरील हरिनिवास तसेच मुलुंडच्या दिशेने सुमारे ४० मीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे. वागळे परिसरातून सेवा रस्तामार्गे येणाऱ्या वाहनांना मॉडेला तसेच रहेजा येथून सिग्नलवर यावे लागणार आहे. त्यामुळे एलबीएस मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. पाचपाखाडी तसेच लुईसवाडी भागात राहणाऱ्या नागरिकांना थेट नितीन जंक्शनला वळसा घालून पुन्हा महामार्गावर यावे लागणार आहे. त्यानंतर महामार्गावरील मार्गिकेमधून सेवा रस्त्यावर येऊन घर गाठावे लागणार आहे. त्यामुळे या रहिवाशांचा वेळ आणि इंधन वाया जाण्याची शक्यता असल्याने या बदलास विरोध होण्याची चिन्हे आहेत.