ठाणे रेल्वे स्थानक म्हणजे समस्यांचे आगारच. या स्थानकाला थेट जागतिक दर्जाचे स्थानक बनविण्याच्या वल्गना काही वर्षांपूर्वी झाल्या. प्रत्यक्षात या स्थानकातील समस्यांना बगलेस मारून आजही लाखो प्रवासी येथून प्रवास करत असतात. या प्रवाशांचे दुखणे ऐकून घेण्यासाठी एका समाजिक संस्थेने सोमवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौजच ठाण्यात उतरवली. साक्षात निर्णय घेणारे अधिकारी येणार म्हणून प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी मोठय़ा उत्साहाने या चर्चासत्रात सहभागी झाले. प्रत्यक्षात ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांच्या कामगिरीचा लेखाजोखाच त्यांना ऐकावा लागला. खासदार महाशयांचे भाषण एवढे लांबले की उपस्थित अधिकाऱ्यांना साधा ब्रदेखील ऊच्चारता आला नाही. त्यामुळे मोठय़ा आशेने या कार्यक्रमासाठी जमलेल्या प्रवाशांच्या पदरी निराशाच पडली.
निर्धार बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेच्या वतीने ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाच्या सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आणि प्रवासी यांच्यात सुसंवाद घडेल अशा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रासाठी ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांमध्ये मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नरेंद्र पाटील, पश्चिम रेल्वेचे एसीएम परवेज खान, मध्य रेल्वेचे सिनिअर डिव्हिजनल इंजिनीअर यू. पी. सिंग, वरिष्ठ ऑपरेशनल मॅनेजर जॉज उत्पन्न यांच्यासह आरपीएफ आणि इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. तर प्रवासी संघटनांच्या मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बरच्या प्रवासी संघटनांनीदेखील उपस्थिती या कार्यक्रमास लावली होती. ‘चर्चासत्र मध्य आणि पश्चिम रेल्वे व प्रवाशांच्या समस्या’ असे कार्यक्रमाचे नाव असल्याने खासदारांसमोर आपले प्रश्न मांडणे शक्य होईल अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र या कार्यक्रमातील प्रस्तावनेपासून तब्बले दोन तास केवळ खासदारांच्या कार्याचा लेखाजोखा घेण्यातच वेळ गेल्याने प्रवाशांच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष झाले. खासदारांनी मात्र आपल्या करकिर्दीचा परिचय करून देत या चर्चासत्राच्या माध्यमातून आपल्या प्रचाराचाच कार्यभार यशस्वीपणे साध्य केला.
सुमारे दोन तासांच्या या कार्यक्रमांमध्ये केवळ ठाणे स्थानकामध्ये सुरू असलेली विकास कामे, नवा एफओबी, सरकते जिने, ठाणे स्थानकाचे वर्ल्डक्लास स्टेशन, बंबार्डियन कंपनीच्या नव्या लोकल, एसी डीसी रूपांतर, अशा नेहमीच चर्चेत असणाऱ्या बोलगप्पा या कार्यक्रमात करण्यात आल्या. सुरुवातीचे काही काळ रेल्वे अधिकाऱ्यांना आपणास येथे बोलवण्यामागचे प्रयोजनच कळू शकले नाही. आपल्याला नेमके काय करायचे आहे हेच माहीत नसल्याने हे अधिकारीदेखील चाचपडताना दिसले. ठाणे स्थानकांमध्ये प्रवाशांच्या समस्या सोडवण्यात खासदार कसे यशस्वी झाले याच विवेचनात कार्यक्रमातील सर्वाधिक वेळ खर्ची घालण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अखेरीस प्रवाशांना बोलण्याची संधी दिली गेली. तरी त्यातून रेल्वे प्रवाशांना प्रवास सुखकर होईल असा कोणताच प्रश्न मांडण्यात आला नाही. त्यामुळे प्रवासी संघटनांनी याबद्दल आपला रोष व्यक्त केला.