शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत जनसागर उसळलेला असतानाच एरवी चतुर्थीच्या दिवशी गर्दीने फुलणाऱ्या टिटवाळ्याच्या श्री गणपती मंदिरात भाविकांचा प्रथमच शुकशुकाट दिसून आला. कोणताही आणि कितीही कडक बंद असला तरी टिटवाळ्याचे गणेश मंदिर चतुर्थीच्या दिवशी कधी ओस पडले असे झाले नाही. रविवार मात्र त्यास अपवाद होता.
टिटवाळ्याचे गणेश मंदिर भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान राहिले आहे. संकष्टी आणि विनायकीनिमित्त तर हे मंदिर भाविकांच्या गर्दीने अक्षरश: ओसंडून वाहते. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानिमित्त रविवारी टिटवाळा परिसरातील रिक्षा, टांगे पूर्णत: बंद होते, त्यामुळे रस्ते ओस पडले होते. सर्वत्र शुकशुकाट होता. टिटवाळा मंदिर परिसरातील फुलबाजार पूर्णत: बंद होता. मंदिराकडे फारसे भाविक फिरकलेच नाहीत. मंदिरात राबता होता तो पुजारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा.
याबाबत टिटवाळा श्री गणपती मंदिराचे विश्वस्त सुभाष जोशी यांनी सांगितले, कितीही कडक बंद असला तरी यापूर्वी मिळेल त्या वाहनाने भाविक टिटवाळ्यात गणपतीच्या दर्शनासाठी येत असत. चतुर्थीला मंदिर ओस पडले असे कधी झाले नाही. शिवसेनाप्रमुखांच्या निधनामुळे रविवारी प्रथमच भाविकांनी मंदिराकडे पाठ फिरवली. एवढा शुकशुकाट आम्ही प्रथमच पाहिला आहे, असे जोशी यांनी स्पष्ट केले.