अडीच वर्षांपूर्वी ठाण्याचा महापौर आम्हीच ठरविला असा आव आणत किंग मेकरच्या भूमिकेत वावरणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था यंदा मात्र इकडे आड तर तिकडे विहीर अशी बनली असून  एकीकडे काँग्रेस आघाडीचा तांत्रिक तिढा तर दुसरीकडे शिवसेनेकडून होणारी कोंडी यामुळे या पक्षाची अवस्था अक्षरश केवीलवाणी बनली आहे.
महापौर निवडणुकीत मदत मिळेल असा शब्द पदरात पाडून घेताना शिवसेनेने स्थायी समिती सभापतीपद सहा महिन्यांपूर्वी मनसेला देऊ केले. दिलेला शब्द पाळायचा तर प्रमुख विरोधकाशी हातमिळवणी केल्यासारखे चित्र लोकांपुढे जाईल, अशी भीती आता मनसेच्या नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे येत्या दहा सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर निवडणुकीत तटस्थ राहाण्याचा पर्याय मनसेपुढे असला तरी कँाग्रेस आघाडीच्या बेडय़ा स्वतच पायात अडकवून घेतल्याने या पक्षाच्या नगरसेवकांची अक्षरश फरफट सुरू झाली आहे. काँग्रेसचे तब्बल सात नगरसेवक आघाडीचा पक्षादेश झुगारण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी आघाडी आणि युती अशा दोन्ही बाजूंकडे असलेला ६५-६५ नगरसेवकांच्या संख्याबळाचा आकडा यंदा पूर्णपणे बदलला आहे.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात येऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला जाहीर केला होता. राज यांच्या पाठिंब्यापूर्वीच कँाग्रेसचे तीन नगरसेवक गळाला लावून खरे तर शिवसेनेने विजयाचे गणित जमविले होते. असे असताना राज यांनी पाठिंब्याच्या घोषणेचे अचूक टायमिंग साधत शिवसेनेचा महापौर जणू आपल्यामुळेच विजयी झाल्याचे चित्र प्रभावीपणे लोकांपुढे मांडले. मात्र, नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीनंतर ठाण्यातील मनसेच्या सात नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीप्रणीत आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेत स्वतच्या पायावर धोंडा मारून घेतला. स्थायी समितीचे विद्यमान सभापती सुधाकर चव्हाण यांनी त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि मनसेच्या सात नगरसेवकांची अवस्था काँग्रेस आघाडीची मांडलिक बनल्यासारखी झाली आहे.
रवींद्र फाटक यांच्या शिवसेना प्रवेशामुळे महापौर निवडणुकीत मनसेची अवस्था प्रभावशून्य झाली आहे. फाटक शिवसेनेत येण्यापूर्वी शिवसेनेने स्थायी समितीचे सभापतीपद मनसेला देऊ केले. महापौर निवडणुकीत गरज लागली तर आम्हाला मतदान करा, शब्द त्यावेळी मनसेकडून घेण्यात आला. कोकण आयुक्तांकडे स्थापन करण्यात आलेल्या आघाडीच्या गटात मनसेचे सात नगरसेवक कँाग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे मनसेला तांत्रिकदृष्टय़ा काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणे भाग पडणार आहे. निवडणुकीत तटस्थ राहिल्यास आघाडीचा तांत्रिक पेच उभा राहू शकतो, अशी भीती मनसेच्या नगरसेवकांना आता वाटू लागली आहे. आघाडीतून बाहेर पडण्यासाठी मनसेने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असली तरी यासंबंधीचा निकाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेला मदत करायची असेल तर मनसेला आघाडीचा पक्षादेश झुगारावा लागेल आणि तटस्थ राहाणेही अडचणीचे ठरू शकते.
यासंबंधी मनसेचे गटनेते सुधाकर चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. दरम्यान, महापौर निवडणुकीत राजसाहेब ठाकरे सांगतील तो निर्णय आम्ही घेऊ, असे पक्षाच्या एका नगरसेवकाने वृत्तान्तला सांगितले. आघाडीची तांत्रिक अडचण आमच्यापुढे असल्याने तटस्थ राहाणे पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही, अशी कबुलीही या नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.