* गुन्ह्य़ांची उकल करण्यात महत्त्वाचे  
*  तीन वर्षांत वापरच नाही
राज्य पोलीस दलात तपासासाठी अद्ययावत उपकरणे नाहीत, अशी एकीकडे स्थिती असताना नागपूर आयुक्तालयात पॉलिरे हे लाखो रुपयांचे यंत्र विनावापर पडून असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
चोरी, घरफोडी, दरोडा अथवा खून झाल्यास घटनास्थळी आरोपींच्या अंगुलीमुद्रा (बोटांचे ठसे) टिपण्यासाठी पॉलिरे हे अद्यावत यंत्र उपयोगी पडते. ओमिनी हे आणखी एक यंत्र असून ते सीआयडीला तर आयुक्तालयला तर जिल्हा मुख्यालयाला पॉलिरे यंत्र देण्यात आले आहे. नागपूर आयुक्तालयात गुन्हे शाखेच्या अंतर्गत विभागात हे यंत्र पडून आहे. घटनास्थळी गेल्यानंतर कपाट अथवा जेथून ठसे मिळवायचे असतात तेथे काळीव चंदेरी अशा दोन रंगाच्या भुकटय़ा टाकल्या जातात. त्यावर विशिष्ट ब्रश फिरविल्यानंतर मग हे ठसे टिपले जातात. हे ठसे बरेचदा डोळ्यांनी दिसताच. पृष्ठभाग बरेचदा चमकदार किंवा विविधरंगी असतो. अशावेळी तेथे सहसा डोळ्यांनी ठसे दिसत नाहीत. त्यामुळे तेथे ठसे नाहीत, असे समजून दुर्लक्ष होत
असे.
पॉलिरे या यंत्राचा तपासात बराच उपयोग होतो. चमकदार आणि विविधरंगी पृष्ठभागावरील अचुक ठसे या यंत्राच्या मदतीने मिळतात. विशिष्ट भुकटी (येथे काळी व चंदेरी उपयोगी नाही) टाकल्यानंतर ब्रश फिरविला जातो. त्यानंतर या यंत्रातून निघणारे किरण अशा पृष्ठभागावर सोडले जातात. या यंत्राचा वापर करण्यासाठी विविध रंगाचे चष्मे घालावे लागतात. त्या-त्या रंगाच्या चष्मातून ठसे दिसतात. त्यानंतर ते टिपले जातात. हे यंत्र हाताळण्यात सोपे व हलके आहे. मात्र, त्याचा वापर तकणाऱ्यास तज्ज्ञ नाही तरी विशिष्ट वैज्ञानिक बाबींची माहिती असावी लागते.
गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी एक तपास पथक जाते. ठसे तज्ज्ञ, छायाचित्रकार आणि इतर पुरावे गोळा करणाऱ्यांचा त्यात समावेश असतो. नागपूर आयुक्तालयातही असे पथक आहे. त्यांच्यासोबत ठसे तज्ज्ञ जात असले तरी त्यात पॉलिरे हे यंत्र नसते, अशी धक्कादायक माहिती आहे.
तीन वर्षांपूर्वी आयुक्तालयाला हे यंत्र मिळाले. युनिटमध्ये यंत्र आल्यानंतर त्याची एक-दोनवेळा चाचणीही घेतली गेली. नंतर त्याचा वापरच केल्या न गेल्याने पडूनच असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्वच ठिकाणी नाही तर गंभीर गुन्ह्य़ांच्यावेळी त्याचा वापर व्हावयास हवा. गेल्या तीन वर्षांत अनेक गंभीर घटना घडल्या. त्यातही त्याचा वापर केला गेला नाही.  
पॉलिरे यंत्राची किंमत लाखोंच्या घरात आहे. राज्य पोलीस दलात एकीकडे अद्यावत तपास उपकरणे नसल्याची परिस्थिती असताना एवढे महागडे आणि उपयुक्त यंत्र विनावापर पडून असेल तर ही गंभीरच बाब म्हणावी लागेल. ‘या माहितीची खातरजमा केली जाईल व त्यानंतर योग्य ती उपाययोजना केली जाईल’, असे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गंगाराम साखरकर यांनी यासंदर्भात ‘लोकसत्ता’ला सांगितले.