सध्या रुपयाच्या घसरणीची चिंता सरकार, सुशिक्षित लोक डॉलरच्या तुलनेत करत असतात. परंतु, मूल्यांच्या घसरणीची चिंता करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी केले.  
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. यावेळी सद्गुरूदास महाराज, राजे मुधोजी भोसले व समितीचे दत्ता शिर्के प्रामुख्याने उपस्थित होते.
 महाराष्ट्रात नागपुरातच शिवराज्याभिषेकाचा सोहळा होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. शिवाजी महाराजांनी पश्चिम महाराष्ट्र हे कर्मस्थान ठरविले असले तरी त्यांना जन्म देणारी माता ही विदर्भकन्या होती. त्यामुळे शिवराज्याभिषेकाचा सोहळा रायगडानंतर नागपुरात होतो याचा आपल्याला सार्थ अभिमान असण्याची गरज आहे.
शिवाजी सारखा पुत्र हा जिजाऊंमुळे जन्मास आला. आजच्या काळात असे शिवाजींसारखे पुत्र जन्मास येतील, पण त्यासाठी मातृशक्तीने चिंतन करण्याची आवश्यकता आहे. गर्भसंस्कारची परंपरा असलेल्या देशात गर्भच दूषित झाले आहे. संस्कारसुद्धा लुप्त झाले असून पुढच्या पिढीची समस्या निर्माण झाली आहे. आज वृद्धाश्रमांची संख्या वाढली असून त्याला कारण म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती जबाबदार आहे. मुलांना इंग्रजी शिकवा. पण, मातृभाषा जगण्याची गरज असल्याचे  प्रतिपादनही त्यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने झाली.
सतीश चाफळे यांनी प्रास्ताविकातून समितीची भूमिका विशद केली. शिवकालीन युद्धनीतीचे प्रशिक्षक भरत भोसले, भूषण जाधव आणि अजय देवगावकर यांचा मुधोजी भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शीतल ताम्हण यांनी तर सुनीता जगताप यांनी आभार मानले.