महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर २७ फेब्रुवारीला पक्षीप्रेमींनी तब्बल ४४ वर्षांनंतर अनुभवलेल्या सारसाच्या संमेलनानंतर सारसांनी आपला मुक्काम हलवला. पावसाळा सुरू झाला की हेच सारस पुन्हा आपल्या जागी परत येतात याची जाण पक्षीप्रेमींना आहे, पण सारसांच्या प्रतीक्षेत असलेल्या पक्षीप्रेमींच्या या आनंदावर पावसाने विरजन घातले. चार महिन्यापूर्वी आनंदोत्सव साजरा करणाऱ्या एक-दोन नव्हे तर तब्बल २४ सारसांनी पावसाने दडी मारल्यामुळे गोंदिया ते बालाघाटच्या सीमेकडे पाठ फिरवली आहे.
महाराष्ट्रात गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या ठिकाणी सारसाची नोंद आहे. त्यापैकी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सारस शिकार आणि छायाचित्रकारांच्या अतिउत्साहाचे बळी ठरले. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात तेथील सारसप्रेमींनी लोकसहभागातून हाती घेतलेल्या प्रकल्पामुळे सारसाची संख्या वाढली. विशेष करून गोंदिया ते बालाघाटच्या सीमेवर सारसांचे वास्तव्य जाणवू लागल्यानंतर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील सारसप्रेमींनी संयुक्तरित्या त्यांच्या संवर्धनाचे प्रकल्प हाती घेतले. गेल्या सात-आठ महिन्यापासून सुरू केलेल्या या संयुक्त संवर्धनाचा परिणाम फेब्रुवारीतील सारस संमेलनाच्या स्वरुपात दिसून आला. उन्हाळयात अन्न मिळत नसल्याने सारस इतरत्र विखुरले जातात आणि पावसाळा सुरू झाला की पुन्हा परत येतात. मात्र, याच सारसांनी आता पावसाअभावी या परिसरात पाठ फिरवली आहे.  
पावसाला सुरुवात होताच सारसांचे मेटिंग सुरू होते. प्रामुख्याने जुन-जुलै हा त्यांचा मेटिंगचा कालावधी असतो. त्यानंतर जुलै-ऑगस्ट या महिन्यात तलाव, बोडय़ा पाण्याने भरल्यामुळे या परिसरात ते घरटी उभारतात. शेतांच्या बाजूला आणि शेतामध्येही ते घरटी करतात आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत पिलांचा जन्म होतो. यावर्षी जुलै उजाडला तरीही पावसाचा पता नाही, त्यामुळे सारसांनीही इकडे पाठ फिरवली आहे. भंडारा-गोंदिया हे तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जात असले तरीही या तलावातील पाणीसुद्धा कमी झाले आहे. बोडय़ा बांध्यांमध्ये परावर्तीत झाल्या आहेत. शेतांचीही परिस्थिती गंभीर असल्यामुळे सारसांना घरटी करायला जागाच उरलेली नाही. त्यामुळे सारसांचा अधिवास सुरक्षित राखण्यासाठी जोरकसपणे या जिल्ह्यात प्रयत्न सुरू झाले आहेत.
महाराष्ट्रातील या दोनच जिल्ह्यात उरलेले सारस नष्ट होऊ नये म्हणून सारसांसाठी अधिवास तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कुंभारटोली नवतलाव आणि परसवाडा या दोन तलावांचे जैवविविधता समितीच्या सहकार्याने पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. ज्या तलावांवर सारसांचे वास्तव्य ते तलाव चांगले आणि ज्या शेतात सारसांचे वास्तव्य ती शेती चांगली असल्याचे मानले जाते. त्यामुळे सारसाच्या संवर्धनासाठी सर्वाच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे, गोंदिया जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर यांनी सांगितले.