राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘त्या’ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तया नवीन कुलगुरूंच्या काळात होणार असल्याचे स्पष्ट झाले. २०१३ मध्ये ५३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तयांसंबंधीची जाहिरात विद्यापीठाने दिली होती. त्यामध्ये कोणाची निवड कोठे करायची यावरून मोठय़ा प्रमाणात पैशाची अफरातफर झाल्याची तक्रार विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे वेगवेगळ्या संघटनांनी केली होती. शिवाय व्यवस्थापन परिषदेतही या विषयावर खडाजंगी झाल्याने हा विषय चव्हाटय़ावर आला.
काही सदस्य जुन्या जाहिरातीनुसार नियुक्तया व्हाव्यात या बाजूचे होते तर काही नियमित कुलगुरूंच्या काळात नवीन जाहिरात देऊन नियुक्तया केल्या जाव्यात या बाजूचे होते. या संदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी.के. अग्रवाल यांनी कुलपती कार्यालयाला पत्र लिहून संबंधित प्रकरणाची माहिती दिली. कुलपती कार्यालयाने योग्य त्या कारवाईसाठी पुन्हा ते पत्र विद्यापीठाकडे वळते केले आहे.
यासंदर्भात कुलगुरूंनी कायदेशीर मत अ‍ॅड. आनंद परचुरे यांच्याकडून घेतले असून लवकरच ते व्यवस्थापन परिषदेत चर्चेला येईल, असे सांगण्यात आले. ३० जून २०१३मध्ये उपकुलसचिव, विद्यापीठ अभियंता, सहायक कुलसचिव, प्रोग्रामर, अधीक्षक, वरिष्ठ व कनिष्ठ लघुलेखक, वाहन चालक आणि लेखापाल आदी ५३ पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली.
त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पात्रतेसंदर्भातील निकष ठरवण्यासाठी डॉ. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली दिशानिर्देश समिती स्थापन करण्यात आली. समितीने केलेल्या शिफारशी कुलगुरूंनी विद्यापीठ कायद्याच्या कलम १४(८) अंतर्गत मान्य केल्या होत्या. अनेक आरोप प्रत्यारोप आणि कुलपती कार्यालयाला पाठवलेल्या पत्रानंतर या सर्व नियुक्तया आता नवीन कुलगुरूंच्या काळात होणार असल्या तरी त्या जुन्या जाहिरातीनुसार होतील की नवीन जाहिरात दिली जाईल, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.