भगवद्गीता नव्हे, भारतीय राज्यघटना हाच राष्ट्रीय ग्रंथ – कुंभारे

केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रेरणा महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना भगवद्गीता हाच भारताचा राष्ट्रीय ग्रंथ असल्याचे वक्तव्य केले होते.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रेरणा महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना भगवद्गीता हाच भारताचा राष्ट्रीय ग्रंथ असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभर पडत असून माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी स्वराज यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करून ‘भारतीय राज्यघटना’ हाच राष्ट्रीय ग्रंथ असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला.
भगवदगीतेसह, धम्मपद, कुराण, बायबल, गुरुग्रंथसाहेब हे सर्व धर्मग्रंथ पवित्र असून ते सर्व भारतीयांना आदरणीय आहे. परंतु नरेंद्र मोदी यांचे सरकार भगव्दगीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देत असेल तर अन्य धर्मियांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भारत हा अनेक धर्म, पंथ, संप्रदाय मिळून बनलेला देश आहे. विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्टय़ व परंपरा राहिलेली आहे. भारतीय राज्यघटना हाच राष्ट्रीय ग्रंथ आहे व त्यामुळे भारताची लोकशाही वर्षांनुवर्षे अखंडित राहील, असे मत कुंभारे यांनी व्यक्त केले.  
या संदर्भात बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन एक निवेदन देणार आहे. यावेळी त्यांना याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात येईल. तसेच ते जेव्हा विदेशात जातात तेव्हा तेथील राष्ट्रप्रमुखाला गीता हा ग्रंथ भेट देतात. यापुढे गीता हा ग्रंथ न देता भारतीय राज्यघटना हा ग्रंथ दिला जावा, अशी मागणी केली जाईल. तसेच याच प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन त्यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचे कुंभारे यांनी सांगितले.
यावेळी भीमराव फुसे, सुनील लांडगे, अशोक नगराळे, वंदना भगत हे पदाधिकारी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Not bhagavad gita the indian constitution is a national book says kumbhare