त्र्यंबकेश्वर तालुक्यात गतवर्षी २९ बालमृत्यू झाले असताना यंदा सहा महिन्यात हा आकडा ३९ वर पोहचला आहे. या पट्टय़ातील बालमृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने त्यामागील कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यास भौगोलिक तसेच वाहतुकीच्या समस्या कारण ठरल्याचे निदर्शनास आल्यावर अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव शासनाने मान्यता देत अंजनेरी व सामुंडी ही उपकेंद्रे मंजूर करण्यात आली. तथापि, वर्षभराचा कालावधी उलटूनही ‘कागदी घोडे’ नाचविण्यापलीकडे गाडी पुढे सरकू शकलेली नाही. आगामी कुंभमेळ्यापूर्वी तरी आरोग्य केंद्राचे काम प्रत्यक्षात सुरू होईल अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
‘सरकारी काम सहा महिने थांब’ याचा प्रत्यय सध्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामस्थ घेत आहेत. २००२ मध्ये त्र्यंबकेश्वरला तालुका म्हणून मान्यता मिळाली. भौगोलिकदृष्टय़ा विचारकरता तालुक्यात इगतपुरीची सहा गावे आली. गावाच्या सीमा कागदोपत्री त्र्यंबक पट्टय़ात आल्याने हद्दीचा प्रश्न आरोग्य तसेच काही विभागाच्या बाबतीत कळीचा मुद्दा ठरला. मात्र या हद्दीचा त्रास आदिवासीबहुल असलेल्या त्र्यंबक पट्टय़ातील अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रकर्षांने होत आहे. अंबोली आरोग्य केंद्राला अंजनेरी, सामुंडी, वावीहर्ष, टाकेदेवगाव, अंबोली, भिलमाळ, काळमुस्ते, चापगाव, तळवाडे, मेढघर, अळवंड, तोरंगण आदी १३ उपकेंद्रे जोडलेली आहेत. १३ उपकेंद्राअंतर्गत ४४ गावे, ९१ पाडे, १३० अंगणवाडय़ा अशा ५४ हजार लोकसंख्येचा प्रदेश सामावलेला आहे. भौगोलिकदृष्टय़ा विचारकरता, वाहतुकीच्या दळणवळणाच्या साधनाची कमतरता, आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील अंतर यामुळे गर्भवती महिला, अपघातग्रस्त नागरीक, सर्पदंश झालेले रुग्ण उपचारासाठी त्र्यंबक ग्रामीण रुग्णालय किंवा नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात जाणे पसंत करतात. गर्भवती महिलांचा शासकीय योजनांमध्ये सहभागी होत द्राविडीप्राणायाम करण्यापेक्षा घरीच प्रसूती होण्याकडे कल राहिला आहे. यामुळे गत काही वर्षांत या पटय़ात बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय राहिले.
दुसरीकडे, वाहतुकीच्या सोयी सुविधांचा अभाव, कच्चे रस्ते यामुळे १३ उपकेंद्रांत परिचारिका तसेच एम.पी.डब्ल्यू. गावात राहत नाही. आठवडय़ातून एकदा किंवा दोनदा गावात येऊन कर्मचारी आन्हिकं उरकतात. यामुळे अनेकदा गर्भवती महिलांची सरकारदरबारी नोंदही नसते. यामुळे योजनांपासून त्या वंचित राहतात. बालकांनाही लसीकरणासाठी अडचणी येतात. या पाश्र्वभूमीवर, वाढती लोकसंख्या तसेच कामाचा वाढता ताण लक्षात घेऊन अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विभाजनाचा प्रस्ताव आ. नितीन भोसले यांनी मांडला होता. मात्र अजूनही त्या अनुषंगाने कोणतीही हालचाल नाही. या एकूणच स्थितीमुळे अत्यवस्थ रुग्णांना जिवाला मुकावे लागत आहे.