कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील १८ खासगी तसेच महापालिकेच्या पाच शाळांना बोगस पटपडताळणी तसेच या शाळांमध्ये अत्यावश्यक सुविधांचा अभाव ही कारणे देऊन ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने संस्थेची मान्यता का रद्द करण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात केल्याने खळबळ उडाली आहे.
शाळा सुरू होण्यास २५ दिवसांचा अवधी उरला असताना शिक्षण विभागाने या नोटिसा पाठविण्यास सुरुवात केल्याने खासगी शिक्षणसम्राटांमध्ये खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे या नोटिसा वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १२ शिक्षण संस्थांना नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा यामध्ये समावेश आहे. राज्यभर बोगस पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती.
 त्या वेळी या २३ शाळांमधील पटसंख्या बोगस दाखविण्यात आली होती. तसेच, विद्यार्थी, शिक्षकांसाठी अत्यावश्यक सुविधांचा शाळेत अभाव होता, असे शासनाच्या निदर्शनास आले होते. महापालिकेच्या ७५ शाळा, २ नगरपालिकेच्या, खासगी विनाअनुदानित ५१, खासगी अनुदानित २१६, कायम विनाअनुदानित १५८ तसेच १२ कनिष्ठ महाविद्यालये अशा एकूण ५१४ शाळांची पाहणी केल्यानंतर त्यामध्ये २ मराठी, २ हिंदी, १ गुजराती, खासगी अनुदानित ४, कायम विनाअनुदानित ७ इंग्रजी शाळा अशा एकूण २३ शाळा बोगस पटपडताळणी व शाळा दुरवस्थेविषयी दोषी आढळून आल्या आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या नोटिसा काढल्या असून पालिका शिक्षण विभागातर्फे त्या वाटप करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १२ शाळांच्या नोटिसा आल्या आहेत. या शाळांना एक महिन्यात आपले अहवाल सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानंतर शासन मान्यता रद्द करण्याबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे पालिकेचे प्रशासन अधिकारी तसेच विस्तारी अधिकाऱ्यांनी सांगितले.