आपल्या चांगल्या आरोग्यासाठी जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे कसे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे, याबाबत मुंबईच्या डबेवाल्यांनी गेल्या आठवडय़ात मुंबईकरांना ‘हात धुण्याचे’धडे दिले. आरोग्यविषयक काही चांगल्या सवयींबाबत मुंबईकरांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘व्हीव्हीएफ इंडिया’कंपनीकडून राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत डबेवाले सहभागी झाले होते. मुंबईच्या डबेवाल्यांनी सुमारे एक लाख लोकांपर्यंत ‘हात धुण्याच्या’चांगल्या सवयीचा संदेश पोहोचविला. आता पुढील आठवडय़ात दहीहंडी उत्सवात डबेवाल्यांचे ‘गोविंदा’ पथक सहभागी होऊन मुंबईकारंना सार्वजनिक स्वच्छतेचा कानमंत्र देणार आहेत.  ‘डबेवाला’ हा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. खासगी किंवा शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नोकरदारांच्या घरून जेवणाचे डबे घेऊन ते त्यांच्या कार्यालयात पोहोचविण्याचे काम गेली अनेक वर्षे मुंबईचे डबेवाले करत आहेत. दररोज लाखो लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या डबेवाल्यांनी आपल्या डबे पोहोचविण्याच्या कामाबरोबरच सामाजिक संदेश देण्याचे हे काम केले असल्याचे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.जेवणापूर्वी आपण आपले हात स्वच्छ धुतले नसतील तर ती बाब आजारपणाला आणि आपली तब्येत बिघडायला किंवा पोटाचे विकार व्हायला निमंत्रण देणारी ठरते. जेवणापूर्वी स्वच्छ हात धुणे ही एक चांगली सवय असून त्याचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे, यासाठी ‘व्हीव्हीएफ इंडिया’या कंपनीने हा उपक्रम राबविला होता. त्यांच्या या उपक्रमाला आमच्या डबेवाल्यांनी सहकार्य केले. कंपनीकडून देण्यात आलेला साबण व ‘हॅण्ड वॉश’ जेवणाच्या डब्यांबरोबर आम्ही आमच्या ग्राहकांना दिला आणि या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे एक लाख लोकांपर्यंत जेवणापूर्वी हात धुण्याच्या सवयीचा संदेश पोहोचविला असल्याचे तळेकर म्हणाले. पुढील आठवडय़ात येणाऱ्या सार्वजनिक दहीहंडी उत्सवात अर्थात ‘गोविंदा’उत्सवात अंधेरी येथील डबेवाले गोविंदा पथक सहभागी होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सार्वजनिक दहीहंडी फोडण्यासाठी डबेवाल्यांचे पथक जाणार असून पथकातील बाल गोपाळ मुंबईकरांना सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणार आहेत. दहीहंडी फोडण्याबरोबरच जेथे अस्वच्छता पाहायला मिळेल तिथे हे पथक हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबविणार असल्याची माहितीही तळेकर यांनी दिली.