पंढरपूर शहरातील नागरिकांना १ फेब्रुवारी १३ पासून दररोज सकाळी ६ ते ६.३० या वेळात श्री विठ्ठल दर्शनाची सुरुवात करण्यात येणार आहे. वरील वेळेत स्थानिक रहिवासी यांना झटपट दर्शन घेता येणार आहे. हा निर्णय सोमवारी सायंकाळी झालेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्यांची बैठक संत तुकाराम भवन येथे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वेळी सदस्य बाळासाहेब बडवे, वा. ना. उत्पात, प्रा. जयंत भंडारे, जयसिंह मोहिते पाटील, वसंत पाटील, नरेंद्र नळगे, कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, व्यवस्थापक एस. एस. विभुते उपस्थित होते.
संपूर्ण राज्यात विविध गावात पंढरपूर विठ्ठल मंदिर देवस्थानच्या मालकी असलेल्या सुमारे १ हजार एकर जमिनी आहेत. त्या समितीच्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने त्या व्यक्तींशी चर्चा चालू समिती करणार आहे. सकाळी ६ ते ६.३० या वेळेत श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनाची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे.
या वेळात दर्शनास जाणाऱ्या भक्तास आपली ओळख द्यावी लागणार आहे. ते स्थानिक रहिवासी असल्याची खात्री करून दर्शनास सोडले जाणार आहे.
वेदान्त भवन व व्हिडिओकॉन येथे भाविकांच्या सोयीकरता उपाहारगृह बांधण्यात येणार आहे. या बैठकीत इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.