रेल्वेमार्गावर एखादा गंभीर अपघात झाल्यास जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात बराच अवधी जातो. हा काळ अत्यंत आणीबाणीचा ठरून त्यात काही जखमी दगावू शकतात. हे टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ कार्यशाळेत आता अपघातात मदतकार्य करणारा एक वैद्यकीय डबा तयार केला आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अरुणेंद्रकुमार यांच्या हस्ते सोमवारी या प्रायोगिक तत्त्वावरील डब्याचे अनावरण करण्यात आले. हा डबा लवकरच वांद्रे टर्मिनस येथील वैद्यकीय गाडीला जोडला जाणार आहे. त्याचबरोबर मालगाडीतील गार्डच्या सौरऊर्जेवर उजळणाऱ्या केबिनचेही अनावरण करण्यात आले.
पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ येथील कार्यशाळेत तयार केलेल्या या वैद्यकीय डब्यात अपघातस्थळी जखमींवर उपचारासाठी लागणाऱ्या अनेक अत्यावश्यक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. हा डबा संपूर्ण वातानुकुलित असेल. यात एक ऑपरेशन थिएटर आणि एक सर्जिकल विभाग असेल. या विभागात १२ रुग्णांवर एकाच वेळी उपचार करण्यात येतील. तसेच या डब्यात जखमींना लागणाऱ्या सर्व औषधांचाही साठा अद्ययावत ठेवण्यात येणार आहे.
हा डबा वांद्रे टर्मिनस येथे असलेल्या वैद्यकीय गाडीला जोडला जाणार असून रेल्वेमार्गावर मोठा अपघात झाल्यास तातडीने अपघातस्थळी बचावकार्यासाठी रवाना होणार आहे.
या वैद्यकीय डब्याबरोबरच पश्चिम रेल्वेच्या अभियंत्यांनी अद्ययावत सौरयंत्रणेचा वापर करून मालगाडीतील गार्डच्या केबिनचे रूपही पालटले आहे.
आता या गार्डच्या केबिनमधील विद्युत यंत्रणा सौरऊर्जेवर चालणार आहे. गार्डच्या केबिमनध्ये आता एलईडी लाइट बसवण्यात येणार असून आसनव्यवस्थाही अधिक आरामदायक करण्यात आली आहे.