हरिभाऊ आदमने कला महाविद्यालयाच्या प्राचार्यानी विद्यापीठाचे नाव पुढे करून विद्यार्थ्यांकडून लाटलेल्या अव्वाच्या सव्वा प्रवेश शुल्काच्या कारणास्तव विद्यार्थ्यांनी आज एनएसयूआयच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.
नॅशनल स्टुडंटस् युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात आज ढोलताशांच्या गजरात आंदोलन करून विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. एनएसयूआयचे राष्ट्रीय प्रतिनिधी आशीष मंडपे म्हणाले, आदमने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वीरेंद्र जुमळे यांनी नागपूर विद्यापीठाचे नाव सांगून बी.ए. अभ्यासक्रमासाठी २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्यांकडून पाच ते दहा हजार रुपये प्रवेश शुल्क घेतले, पण या अभ्यासक्रमांचे शुल्क जेमतेम १३०० रुपये आहे. शुल्क घेताना देणगी असल्याचे न सांगता हे शुल्क आमच्यासह इतरही मुलांकडून लाटण्यात आले. यासंदर्भात अनूपकुमार कुलगुरू असल्यापासून पाठपुरावा करीत आहे. जे विद्यार्थी अपेक्षित शुल्क देऊ शकले नाहीत, त्यांना प्रवेश दिला नाही. विद्यापीठाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या. विद्यापीठाने अनेकदा प्राचार्य जुमळे यांना पत्र पाठवून यासंबंधी सात दिवसांच्या आत उत्तर सादर करण्याची सूचना केली.
 मात्र, प्राचार्यानी विद्यापीठाच्या पत्रांना न जुमानता तीन महिन्यानंतर त्यांचे उत्तर सादर केले. तसेच विद्यामान कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी समिती स्थापन करून विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या वाढीव शुल्काची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले.
यासंदर्भात प्राचार्य डॉ. जुमळे म्हणाले, मंडपे नावाचा मुलगा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचा कार्यकर्ता असून तो आणि त्याने आणलेल्या मुलांना प्रवेश न दिल्याने त्याने विद्यापीठात तक्रारी केल्या.
 शिवाय, शुल्क घेण्यात मी काही घोटाळा केला, असे त्याला वाटत असल्यास त्याने पोलिसात तक्रार करावी. आज २५ वर आंदोलनकर्त्यांनी कुलगुरूंऐवजी प्र-कुलगुरूंना भेटण्यास स्पष्ट नकार दिला.