शालेय पोषण आहारातील साडेआठ लाख रुपयांचा तांदूळ अहमदाबाद येथे काळ्याबाजारात विक्री करण्यास नेणाऱ्या दोन मालमोटारी परभणी पोलिसांनी गुरुवारी रात्री पकडल्या. शालेय पोषण आहाराचा वाहतूक पुरवठादार सुनील मदनलाल जेथलिया याच्यासह या वेळी १२ जणांना अटक करण्यात आली. नांदेडचा किशोर शर्मा मात्र पसार झाला. तांदळासह दोन मालमोटारी, मोटार व रोख ६ लाख १५ हजार रुपये रक्कम जप्त करण्यात आली. शालेय पोषण आहाराचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात परभणी गुन्हे शाखेच्या पथकाला आलेले हे मोठे यश आहे.
परभणी व िहगोली जिल्ह्यांसाठी शालेय पोषण आहार वाहतूक पुरवठादार प्रवीण ट्रेडिंग कंपनीचा सुनील जेथलिया (गेवराई) आहे. गुरुवारी सायंकाळी एमआयडीसीतील शासकीय गोदामातून पोषण आहाराचा तांदूळ अहमदाबादकडे जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणव अशोक व निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेचे विशेष पथक एमआयडीसीत दाखल झाले. याच वेळी एक मालमोटार एमआयडीसीतून वसमत रस्त्याकडे जाताना दिसली. पाठलाग करीत ही मालमोटार झिरोफाटा येथे अडविली. चालकाने आणखी एक मालमोटार असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने या दोन्ही मालमोटारी जप्त केल्या. जि. प.च्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यावेळी हा तांदूळ शालेय पोषण आहार योजनेतील असल्याचे स्पष्ट झाले.
नवा मोंढा पोलीस ठाण्याचे उपअधीक्षक प्रीतम यावलकर व निरीक्षक सुनील जैतापूरकर कर्मचाऱ्यांसह एमआयडीसीत दाखल झाले. वाहतूक पुरवठादार जेथलियासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अन्य आरोपी – सुशील रामनारायण सारडा (परळी), शेख रियाज, लतीफ (कुरूंदा, तालुका वसमत), श्रीपाद रवींद्र मसलकर (परतूर), बालासाहेब एकनाथ मुंडे (हिरेवाडी, तालुका परळी), अशोक मुरलीधर चव्हाण, संतोष सोमनाथ कराळे (दोघे परभणी), सुरेश लक्ष्मण दवणे (कुरूंदा) व राजस्थानमधील मेहराम माजीरखाना, कैलास घनशाम विस्णवी, मुजीबखाँ अहमद खाँ पठाण, रामेश्वरलाल रामचंद्र विस्णवी या १२ जणांना अटक केली. नांदेडचा किशोर शर्मा पसार झाला.