विज्ञानाचे आधुनिक ज्ञानतीर्थ असलेल्या जगप्रसिध्द लोणार सरोवरात व लगतच्या अभयारण्यात होणाऱ्या वाढत्या मानवी हस्तक्षेपाला पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाच्या लोणार विकास आराखडय़ाअतंर्गत वनखात्यामार्फत करण्यात आलेली सर्वच कामे अतिशय निकृष्ट दर्जाची करण्यात आली. सुमारे ६० लाख रुपये खर्चाच्या सरोवरासभोवतालच्या आठ किलोमीटरहून अधिक तारकुंपणाची अक्षरश: वाट लागली आहे. या बांधकामात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात आल्याने या कुंपणाचा उद्देश सफल न होता लोणार सरोवर व अभयारण्य असुरक्षित होण्यासोबत हा सर्व पैसा पाण्यात गेल्यागत आहे.
जगप्रसिध्द लोणार सरोवराचा सर्वागीण विकास करतांना त्याच्या मूळ नैसर्गिक सौंदर्याला व वैज्ञानिक ठेव्याला कुठल्याही प्रकारची बाधा पोहोचू नये, अशी सर्वसाधारण अपेक्षा आहे. लोणार सरोवराचे संवर्धन व संरक्षण अशी ती गोंडस संकल्पना आहे. या सरोवराच्या संवर्धन व संरक्षणासाठी राज्य शासनाने स्वतंत्र लोणार विकास आराखडा तयार केला. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या जबाबदारीसह वन विभागाकडे प्रमुख कामे देण्यात आली आहेत. सरोवर परिसर व संलग्न अभयारण्य वनखात्याच्या अखत्यारीत येते. सरोवराच्या संवर्धनासाठी सरोवरात वाढणाऱ्या पिसाळ बाभळीचे समूळ उच्चाटन करणे, सरोवराच्या काठावर उघडय़ावर शौच्चास बसणाऱ्यांवर र्निबध घालणे, सरोवराचे नैसर्गिक सौंदर्य व वैज्ञानिक महत्त्व अबाधित ठेवणे, पर्यटकांसाठी व्ह्य़ू पॉईंट तयार करणे, वृक्षतोडीला प्रतिबंध घालणे इत्यादी कामांसोबत संरक्षण व मानवी हस्तक्षेप थांबविण्यासाठी आठ किलोमीटरचे दर्जेदार व सक्षम तारकुंपण तयार करण्याची योजना आखण्यात आली. या योजनेसाठी ६० लाख रुपयांची भरभक्क म तरतूद करण्यात आली. वनखात्याकडून करण्यात आलेले हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे तार हे केवळ लोखंडी अ‍ॅंगलला लटकविण्यात आले आहेत. निधी खर्च केल्यानंतरही ठिकठिकाणी हे काम अर्धवट व अपूर्ण आहे.
हे तारकुंपण आराखडय़ातील अंदाजपत्रकानुसार करण्यात आलेले नाही. यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी जाळी अतिशय निकृष्ट दर्जाची आहे. या जाळीचे आयुष्य  सहा महिन्यांपेक्षा अधिक असूच शकत नाही, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
अंदाजपत्रकानुसार  यासाठी जमिनीत रोवण्यात आलेले अ‍ॅंगल २ ते ३ फुटापर्यंत न रोवता ते केवळ १ ते १.५ फूट खोलवरच रोवण्यात आले आहेत. कमी खोदकाम व क्रॉंक्रीट भराईमुळे तारकुंपणाचे अ‍ॅंगल जागोजागी निखळून पडत आहेत. हे तारकुंपण अद्यापही पूर्ण झालेले नाही. लोणार सरोवर व अभयारण्याचे संरक्षण व संवर्धनाचा उद्देश अशा निकृष्ट कामांमुळे अजिबात सफल झालेला नाही. यासाठी वन खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांची  सखोल चौकशी करण्यात यावी, त्यांच्या विरोधात प्रशासकीय व फ ौजदारी कारवाई करण्यात यावी, अपहाराची रक्क म त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, मोजमाप नोंदणी व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी पक्की करण्यात यावी, अशी लोणार अभ्यासप्रेमींनी मागणी केली आहे.
या कामाची चौकशी अमरावती मुख्य वनसंरक्षकाच्या दक्षता पथकाकडून करण्यात येऊ नये, या पथकाकडून मोठय़ा प्रमाणावर चौकशा मॅनेज केल्या जातात, असाही आरोप लोणार अभ्यासप्रेमींनी केला आहे.    लाखो  रुपये खर्च करून जगप्रसिध्द लोणार सरोवराचे नष्टचर्य संपत नसल्याबद्दल लोणार   अभ्यास    मंडळाचे    सदस्य डॉ.अनिल मापारी यांनी   सखेद आश्चर्य   व्यक्त   केले आहे.