पनवेल शहरातील रस्ते चालण्यायोग्य राहण्यासाठी शिवसेनेने वीजवाहिन्यांच्या भूमिगत काम करण्याला विरोध केला आहे. पावसाळा तोंडावर आल्याने शहरभरातील रस्ते खोदून ऐन पावसाळ्यात सामान्य पनवेलकरांना पाण्यात वाट शोधण्याची वेळ येऊ नये म्हणून हा पवित्रा घेतला असल्याची माहिती पनवेल नगर परिषदेतील शिवसेनेचे स्वीकृत सदस्य प्रथमेश सोमण यांनी दिली.
पनवेल शहरात या अगोदरही टेलिफोन, मलनि:सारण वाहिनी व पाण्याच्या वाहिनीसाठी रस्ते खोदकाम करून रस्त्यांना खड्डय़ांचे रूप आणले आहे. नगर परिषदेने महानगर गॅस व रिलायन्स ४जीसाठी रस्ते खोदकामाला परवानगी दिली आहे. शहरातील मुख्य रस्ते मुंबई महानगर रस्ते विकास महामंडळ यांच्या माध्यमातून काँक्रीटीकरण होणार आहेत.
मात्र पावसाळ्यात पनवेलकरांना रस्त्यामध्ये पनवेल शोधण्याची वेळ येऊ नये म्हणून शिवसेनेने हा अट्टहास धरला आहे. शहरातील रस्त्यांजवळ राहणाऱ्यांना या खड्डय़ांमुळे धुळीचा त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे पावसाळ्यातील खोदकामे टाळण्यासाठी शिवसेनेने नगर परिषदेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे या खोदकामाला नगर परिषदेमधील सत्तारूढ सदस्य मंडळींनी व प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर शिवसेनेने रस्त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शविली
आहे.