रेल्वे रुळांना तडा, पेंटोग्राफमध्ये बिघाड, ओव्हरहेड वायर तुटली, सिग्नल यंत्रणा कोलमडली, रुळावर पाणी साचले.. मध्य रेल्वे विस्कळीत होण्यासाठी यापैकी कोणतेही एक कारण तसे पुरेसे असते. ठाण्याच्या पुढे झपाटय़ाने विकसित होणाऱ्या वेगवेगळ्या उपनगरांमधील प्रवाशांनाही मध्य रेल्वेच्या नाकर्तेपणामुळे अक्षरश: हैराण करून सोडले असून दिवा, मुंब्रा, कळव्याप्रमाणे कल्याण, डोंबिवलीच्या आसपास असलेली आणखीही काही स्थानके असंतोषाच्या तोंडावर उभी ठाकली आहेत.
नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच ठाकुर्ली स्थानकातील पेंटोग्राफ तुटल्याची घटना घडली आणि त्याचा उद्रेक दिवा, मुंब््रयात झालेला पाहायला मिळाला. दिव्यामध्ये प्रवाशांनी रुद्रावतार धारण केला. रेल्वे रुळावर उतरलेल्या प्रवाशांनी रेल रोको करून असंतोषाला वाचा फोडली. काही हिंसक प्रवाशांनी तिकीट कार्यालय, एटीव्हीएम आणि रेल्वेच्या संपत्तीची नासधूस केली. दिव्याला पेटलेला हा वणवा काही वेळातच डोंबिवली स्थानकापर्यंत पोहोचला. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार मिळणाऱ्या सापत्न वागणुकीचा पुरता वचपा या वेळी प्रवाशांनी काढला. हा असंतोष केवळ या दोन स्थानकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना
पावलोपावली अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते आहे. कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा, मुंब्रा, उल्हासनगर, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ अशा स्थानकांमधील प्रवाशांना तर दररोज या समस्यांचा सामना करावा
लागतो. ठाणेपल्याडच्या अशा ज्वालामुखीच्या तोंडावर असलेल्या स्थानक आणि त्या स्थानकांतील समस्यांचा वेध..

फेरीवाल्यांच्या मुजोरीला प्रशासनाची साथ
ठाणे : फेरीवाले आणि बेशिस्त पार्किंगचा विळखा ठाणे रेल्वे स्थानकाला बसलेला असून हा विळखा अधिकच घट्ट होत आहे. या प्रकाराला रेल्वे अधिकाऱ्यांचा आणि रेल्वे सुरक्षा दलाचा पाठिंबा असल्याचे चित्र आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू नुकतेच ठाणे स्थानकातून कोकणाकडे गेले. त्यांच्या प्रवासासाठी ठाणे स्थानकाचा पुरता कायापालट करण्यात आला होता. त्यांच्या दौऱ्यापूर्वी दहा दिवसांपासून या भागातील बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्यात आली होती, तर फेरीवाल्यांचा डेरा हटवण्यात आला होता. मात्र रेल्वेमंत्र्यांची पाठ फिरताच काही तासांतच ठाणे स्थानकाला फेरीवाल्यांनी जखडून टाकले आहे. प्रवाशांना होत असलेल्या त्रासामुळे आतापर्यंत सगळं काही निमूटपणे सहन करणारे प्रवासी संतापल्यास ठाण्यातील रेल्वे प्रशासनाला त्यांना आवरणे कठीण होऊन जाऊ शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.

छोटय़ा स्थानकांना वाली कोण?
आंबिवली : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चेनस्नॅचिंग करण्याचे प्रकार येथे सर्रास घडतात. त्यामुळे महिला प्रवाशांसाठी रात्रीच्या वेळी अत्यंत धोक्याचे स्थानक म्हणून आंबिवली ओळखली जाते. अपुऱ्या पोलिसांमुळे महिला प्रवाशांना जीव धोक्यात घालून येथून प्रवास करावा लागतो.
वांगणी : मध्य रेल्वेच्या मार्गावर पुढील आंदोलन कोणत्याही स्थानकावर झाले तर ते वांगणी स्थानकात. कारण नवे प्रकल्पांची जंत्री या भागात सुरू असून प्रवाशांची संख्याही कमालीची वाढली आहे. मात्र अजूनही या स्थानकात रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी पूल नाही. यामुळे अपघात होत असून अपघात झाल्यानंतर सुमारे एक ते दोन तास या भागात कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत पोहोचवली जात नाही. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने असलेली गोल्डन वेळ निघून जाऊन प्रवाशांचा मृत्यू होतो. या परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी या भागातील प्रवाशांनी या भागातील यार्ड बनवण्याआधी पूल बांधा, असा आंदोलक पवित्रा घेतला होता. त्यामुळे वांगणी स्थानक ज्वालामुखीच्या तोंडावर आहे, असे म्हणावे लागले. त्यामुळे वांगणीच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी संघटनेचे मनोहर शेलार यांनी केली आहे.

रखडलेली शटल सेवा
उपनगरीय रेल्वेमध्ये सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या ठाणे स्थानकाचे प्रवाशांच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेऊन २००८ साली तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी ठाण्यातून कल्याण, कर्जत, कसारा आणि खोपोली या स्थानकांमध्ये जाण्यासाठी ७४ शटल सेवा देण्याची घोषणा केली होती. दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांतील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन शटलची ही मागणी अवघ्या वर्षभरामध्ये पूर्ण करण्याची गरज होती. मात्र या घोषणेला सुमारे पाच वर्षे ओलांडून गेली असताना ही मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे शटल सेवा सुरू केल्यास मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा होईल. त्यामुळे शटलसेवा बासनात गुंडाळण्याचा प्रताप रेल्वे प्रशासनाने केला आहे.

बगीचा नको, फलाट द्या!
आसनगाव, वाशिंद : अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या या स्थानकाला घरचा फलाट उपलब्ध व्हावा यासाठी अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येते. मात्र फलाटाऐवजी बगीचा उपलब्ध करून रेल्वे प्रशासनाने येथील प्रवाशांची खिल्ली उडवली आहे. सातत्याने वाढत असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत लोकलची संख्या कमी असून या स्थानकात प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांच्यात सातत्याने खटके उडत असतात. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना घेराव घालणे, स्टेशनची तोडफोड असे प्रकार सातत्याने या भागात घडतात.
वाशिंद स्थानक पूर्व-पश्चिम जोडणारा एकही रस्ते वाहतूक करू शकेल असा पूल नसल्याने हा भाग अपघातप्रणव क्षेत्र ठरू लागला आहे. रूळ ओलांडताना या भागात प्रवाशांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे या स्थानकांचा विकास करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज प्रवासी संघटनेने व्यक्त केली.

‘दिव्या’खाली अंधारच?
दिवा : नव्या वर्षांच्या सुरुवातीला पेटलेला दिवा अजूनही धगधगत आहे. आंदोलनानंतर काही वेळातच दिवा-सीएसटी लोकलची घोषणा झाली, तर काही दिवसांमध्ये तांत्रिकदृष्टय़ा हे शक्य होणार नसल्याची कारणे देत दिवा-सीएसटीला लाल दिवा दाखवण्यात आला. त्यामुळे दिव्यातील परिस्थिती अजूनही धगधगती असून आंदोलकांवर पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईचासुद्धा संताप आजही प्रवाशांच्या मनात आहेत. शिवाय महिलांसाठी दिवा स्थानक असुरक्षित ठरत असून रेल्वे पोलिसांच्या भूमिकेविरोधातही प्रवाशांमध्ये राग आहे. यातूनच प्रवाशांनी लाल फिती लावून याविषयीचा रोष प्रकट केला होता. दिवा स्थानकाला विशेष लोकलबरोबरच तिकीट घर, फाटकाऐवजी आरओबी होण्याची गरज आहे. कोकण रेल्वेला जोडणारे स्थानक असल्याने तेथील त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही असुविधांचा सामना करावा लागतो. दिवा स्थानकाला नव्या अर्थसंकल्पाकडून भरीव मदतीची अपेक्षा असल्याचे मत दिवा रेल्वे प्रवासी संघाचे आदेश घनघाव यांनी सांगितले.

रेल्वे बजेटकडून अपेक्षा
महाराष्ट्रातील रेल्वे मंत्री मिळाल्याने यंदा रेल्वे अर्थसंकल्पाकडून ठाणेकरांना मोठय़ा अपेक्षा आहेत. त्या दृष्टीने रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या प्रवासी संघटनांनी रेल्वे मंत्र्यांकडे मांडल्या असून रेल्वे मंत्री या अर्थसंकल्पात त्या पूर्ण करतील का हे पाहणे औचित्याचे ठरेल.
* ठाणे, कल्याण, डोंबिवली स्थानकांचा आदर्श स्थानक म्हणून विकास करण्यात यावा.
* प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि जास्तीतजास्त निधी उपलब्ध करून द्यावा.
* पाचवा व सहावा रेल्वे रूळ तात्काळ कार्यान्वित करण्यात यावा.
* सर्व लोकल १५ डब्यांच्या करण्यात याव्यात.
* डबल डेकर आणि वातानुकूलित रेल्वे सेवा कार्यान्वित करा.
* कल्याण टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावावा.
* कल्याण-वाशी, पनवेल रेल्वे रुळांचे काम तात्काळ सुरू व्हावे.
* कल्याण-नगर रेल्वे मार्ग सुरू व्हावेत.
* सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात यावी.
* फाटके बंद करून त्याऐवजी रेल्वे पुलांची व्यवस्था करण्यात यावी.
* खासदारांनी रेल्वे स्थानक दत्तक घेऊन त्यांची सुधारणा करण्यात यावी.

घोषणा पूर्ण करा
रेल्वे बजेटमध्ये गेल्या पाच वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात घोषणांचा पाऊस पडल्याचे दिसून आले आहे. मात्र प्रत्यक्ष मात्र या घोषणा पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. यंदाच्या बजेटमध्ये घोषणांवर भर देण्यापेक्षा आधीच्या चांगल्या घोषणा पूर्ण करा आणि त्यानंतर नव्या कामांना सुरुवात करा, असा सल्ला उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.

आदर्श स्थानके कधी?
ठाणे, कल्याण, डोंबिवली या स्थानकांना आदर्श स्थानके बनवण्याच्या वल्गना करण्यात आल्या होत्या. ही स्थानके सध्या समस्यांच्या गर्तेत असून स्वच्छतागृह, अस्वच्छता, फेरीवाले, कमी उंचीचे फलाट, अरुंद पूल, अपुरी एटीव्हीएम, सीव्हीएम मशिन्स, असुरक्षितता अशा समस्यांना तोंड देत आहेत. त्याच वेळी अंबरनाथ, दिवा, डोंबिवली, कर्जत, कसारा, खोपोली आणि उल्हासनगर या स्थानकांना आदर्श स्थानक बनविण्याचा विडा रेल्वे प्रशासनाने उचलला आहे. त्यामुळे ही आदर्श स्थानके कधी बनणार, असा सवाल प्रवासी संघटना करू लागल्या आहेत.

डोंबिवली की ‘कोंबिवली’
डोंबिवली : सकाळच्या गर्दीच्या काळात मुंबईकडे जाणारी लोकल डोंबिवली स्थानकात पोहोचल्यानंतर गाडीमध्ये घुसण्यासाठी प्रवाशांचे एकच तुंबळ युद्ध सुरू होते. आतल्या आणि दरवाज्यातील प्रवाशांना आत लोटण्याचा प्रकार पाहिल्यानंतर डोंबिवली नव्हे तर कोंबिवली म्हणण्याची वेळ प्रवाशांवर येऊन ठेपते. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये खटके उडून त्यांच्यात हाणामारी होण्याच्याही घटना घडत असतात. दिव्याप्रमाणेच डोंबिवली स्थानकातही हिंसक प्रवासी आढळून येतात.

जुळ्या स्थानकांची जुळी दैना
अंबरनाथ, बदलापूर : या दोन्ही स्थानकांना जुळी स्थानके म्हणणे योग्य ठरेल. दोन्ही स्थानकांवर तीन फलाट असून त्यावरील समस्यासुद्धा सारख्याच आहेत. अरुंद रेल्वे पूल, त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडणारे प्रवासी असे चित्र या स्थानकात दिसून येते. बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक १ वर बांधण्यात आलेल्या पुलाचा जिना अत्यंत अरुंद आहे. फलाटावर गाडय़ा आल्यानंतर या पुलावर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रवासीसुद्धा ही चेंगराचेंगरी टाळण्यासाठी रुळांवर उडय़ा घेतात.