विधान परिषदेचे माजी आमदार लक्ष्मण माने यांनी आपला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याची तक्रार त्यांच्याच संस्थेत काम करणाऱ्या तीन महिलांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीनंतर माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
माजी आमदार माने यांची सातारा तालुक्यात भटक्या विमुक्तांच्या संदर्भात काम करणारी एक संस्था आहे. संबंधित महिला या संस्थेत काम करतात. त्यांनी आज सातारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की माने आपल्याला त्यांच्या किंवा त्यांच्या जावयाच्या घरी बोलावून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ करतात. संबंधित महिलांनी अशी तक्रार दाखल करताच सातारा पोलीस ठाण्यात माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक श्रीरंग लेघे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक नीता केळकर यांनी संबंधित महिलांची भेट घेतली. तसेच पत्रकार परिषद घेऊन माने यांच्यावर कारवाईची तसेच त्यांची पद्मश्री पदवी काढून घेण्याची व संस्थेवर कारवाईची मागणी केली.