नाशिक रोड परिसरात एका मोबाइल कंपनीने भूमिगत केबल टाकण्यासाठी महापालिकेचा चांगला रस्ता खोदून नुकसान केल्याबद्दल कंपनीविरुद्ध महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक ५५ व ५६मध्ये नाशिक-पुणे महामार्गापासून शिखरेवाडी मैदानापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे, परंतु एका मोबाइल कंपनीने भूमिगत केबलचे काम करण्यासाठी महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता खड्डा खोदून रस्त्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले. या खोदकामात रस्त्याखाली असलेली जलवाहिनी ठिकठिकाणी तोडण्यात आली, तसेच नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी घेतलेली नळ जोडणी तोडण्यात आली. ही नळ जोडणी पुन्हा सुरळीत न केल्याने अनेकांचा नळ पाणीपुरवठा बंद झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
या संदर्भात महापालिकेचे अभियंता नीलेश साळी यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता राजेंद्र घेगडमल व मधुसुंदर चव्हाण यांच्या तक्रारीवरून सदर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.