उसदराच्या आंदोलनाचा प्रारंभ दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण व विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडमधून करण्याची घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केली. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्याशी अधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यामध्ये पाटील यांच्याकडून आंदोलनाची जागा, स्वरूप या विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेमकी माहिती मिळण्यास अपयश आल्याचे समजते.
यंदाच्या हंगामातील उसाचा पहिला हप्ता विनाकपात ३ हजार रुपये मिळावा. अन्यथा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे गावातून (कराडमधून) येत्या शुक्रवारपासून (दि. १५) आंदोलनाचा इशारा राजू शेट्टी यांनी जयसिंगपूरमधील ऊस परिषदेत दिला होता. यानंतर खबरदारी म्हणून तसेच, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रांताधिकारी संजय तेली, पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, बी. आर. पाटील, नितीन जगताप यांच्यासह प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर घ्यावयाच्या दक्षतेसंदर्भात चर्चा झाली. आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भातही काही निर्णय घेण्यात आले असल्याचे समजते.