महापालिकेत गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदाधिकारी पाठीशी घालत असल्याचा प्रकार घडल्यानंतर आयुक्तांनी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच बदल्यांचे सत्र सुरू केले आहे.
महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी पाणीपुरवठा विभागातील विजय यादव या अधिकाऱ्यासह तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यासह एकाच वेळी २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढल्याने महापालिकेत खळबळ उडाली. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही हप्तेखोरी व अकार्यक्षमतेचे आरोप नेहमी केले आहेत. त्या विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे शहरात अतिक्रमणाची समस्या गंभीर झाल्याचे व अतिक्रमणधारक निर्धास्त असल्याचे चित्र पाहावयास मिळते. आयुक्त कापडणीस यांनी शहराच्या घाणेकर चौकात अतिक्रमण विभाग अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा गैरप्रकार प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कार्यालयात दाखल होताच ठेकेदार सुनील कोल्हेसह अतिक्रमण विभागाच्या १२ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश काढले. मात्र त्यानंतर ठेकेदार कोल्हेचे नातेवाईक असलेले मनसेचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक ललित कोल्हे यांनी आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर निलंबनाचे आदेश निघाले नसल्याचे सांगण्यात येते.आयुक्तांनी कोणत्याही प्रसंगात कणखरपणा दाखविण्याची गरज असल्याचे अन्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आयुक्तांनी अलीकडेच पाणीपुरवठा विभागातील विजय यादवसह अन्य दोघांचे निलंबन करताना २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या करण्याविषयी कोणालाच आक्षेप नसल्याचेही दिसून आले.
आयुक्तांनी कोणाच्या दबावामुळे कारवाई करू नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आयुक्तांनी यापूर्वीही आस्थापना विभागातील वरिष्ठ लिपिक नारायण जगताप यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली होती. त्या कारवाईविषयी वेगळी चर्चा सुरू होताच त्यांना चौकशीच्या अधिन राहून कामावर रुजू करून घेण्यात आले होते. जगताप सध्या सेवानिवृत्त झाले आहेत.दुसरीकडे तत्कालीन स्थानिक स्वराज्य संस्था कर अधीक्षक राजेंद्र पाटील यांना विभागाच्या कमी उत्पन्नास जबाबदार धरून नोटीस बजावण्यात आलेली असताना भांडार विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. उत्पन्नातील प्रचंड घट पाहता उपायुक्तांकडून राजेंद्र पाटील यास तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या.