वारंवार तक्रारी येत असल्याने वादग्रस्त ठरलेली क्लीन अप मार्शल्सची योजना पालिका पुन्हा सुरू करीत आहेत. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या ‘साम’मार्गाला मुंबईकरांना वाटाण्याच्या अक्षता लावल्याने पालिका मार्शलमार्फत ‘दंडा’ची भाषा करणार आहे. शहराच्या प्रत्येक वॉर्डमध्ये किमान ३० क्लीन अप मार्शल मुंबईकरांना स्वच्छतेचे धडे देतील.
मुंबईकरांना स्वच्छतेची शिस्त लावण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आर. ए. राजीव यांनी २००७ मध्ये क्लीन अप मार्शलना आणले. रस्त्यावर कचरा टाकण्यापासून थुंकण्यापर्यंत तसेच जैविक कचऱ्यापासून डेब्रिज टाकण्यापर्यंत सर्व ठिकाणी दंड करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले. सुरुवातीला त्याचा प्रभाव जाणवला, मात्र त्यानंतर मार्शल जबरदस्तीने दंड वसूल करतात अशा तक्रारी सुरू झाल्या. जैविक कचऱ्यासाठी एक ते दहा हजार रुपये तर डेब्रिज टाकल्यास वीस हजार रुपयांचा दंड असल्याने त्यात गैरव्यवहार होत असल्याचेही आरोप झाले. क्लीन अप मार्शलमधून पालिकेला वर्षांला सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांचा दंड गोळा करता येत होता. मात्र या वादग्रस्त पाश्र्वभूमीवर २०१४ पर्यंतच सुरक्षा एजन्सीसोबत असलेले क्लीन अप मार्शलचे कंत्राट पालिकेने पुढे वाढवले नाही.
आता पुन्हा एकदा क्लीन अप मार्शल मुंबईच्या रस्त्यावर दिसणार आहेत. माजी आयुक्त सीताराम कुंटे यांच्या काळातच यासंबंधी घनकचरा व्यवस्थापनाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला होता. क्लीन अप मार्शलकडून जमा करण्यात येत असलेल्या दंडाची रक्कम आर्थिक ताळेबंदात वेगळी मांडण्याची सूचना तत्कालीन आयुक्तांनी केली होती. तसेच क्लीन अप मार्शलचे जैविक कचरा तसेच डेब्रिजसाठी दंड करण्याचे अधिकारही काढून घेण्याचे ठरले. त्यानुसार आता पालिकेने क्लीन अप मार्शलसाठी सुरक्षा एजन्सीसाठी निविदा मागवल्या आहेत. सर्व २४ वॉर्डमध्ये साधारण दहा ते पंधरा क्लीन अप मार्शल नेमण्याचा पालिकेचा विचार आहे. त्यानुसार निविदांना योग्य प्रतिसाद मिळाला तर वर्षांअखेपर्यंत क्लीन अप मार्शल पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर दिसू लागतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्लीन अप मार्शलसाठी निविदा पाठवण्याची मुदत ३ जुलै आहे. त्यानंतर त्यांची छाननी करून स्थायी समितीसमोर प्रस्ताव येईल. समितीने मान्यता दिल्यावर क्लीन अप मार्शलचे काम सुरू होईल. प्रत्येक वॉर्डसाठी एक सुरक्षा एजन्सी नेमली जाणार असून त्यांनी किमान तीस क्लीन अप मार्शल नेमणे अपेक्षित आहे, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रकाश पाटील यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once again cleanup marshal in mumbai
First published on: 16-06-2015 at 02:13 IST